सत्ताधारी भाजप सरकारची निष्क्रियता आणि वाढत्या दलित अत्याचारांविरोधात उपोषण करण्याच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हाकेला प्रतिसाद देत नवी मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी सोमवारी बेलापूर येथील कोकण भवनात उपोषण केले.

केंद्र शासन तसेच भाजपप्रणीत इतर राज्य शासनांच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट होत असल्याने हे आंदोलन केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. काही संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. ‘भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या, आंदोलनांना हिंसक वळण लागले, त्यामध्ये अनेक निष्पाप बळी गेले. देशभरात विविध राज्यांत जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्यात आली. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेल्या दंगलींत भाजपा कार्यकर्त्यांचा हात होता, बिहार दंगली प्रकरणी केंद्रीय मंत्री अश्विन कुमार चौबे यांचे पुत्र अरिजित शास्वावत यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य घटक भाजपशी जवळीक असणारे होते,’ असे आरोपही यावेळी करण्यात आले. असे संघर्ष निर्माण करणे ही भाजपची रणनीती आहे का? असा सवाल करण्यात आला.