नवी मुंबईत गेली वीस वर्षे केवळ माजी मंत्री गणेश नाईक यांना धोबीपछाड देण्याचे स्वप्न उराशी बाळगून राजकारण करणाऱ्या स्थानिक काँग्रेसने अखेर रविवारी पुन्हा एकदा हात दाखवून अवलक्षण केले.
फुटकळ असलेली एक प्रभाग निवडणूक प्रतिष्ठेची करून शिवसेनेनेही काँग्रेसच्या हातात धनुष्यबाण देऊन स्वत:चे हसे करून घेतले. पालिका सत्तेत अर्धे वाटेकरी असलेल्या काँग्रेसने यापूर्वी वरिष्ठांना विश्वासात न घेता आत्मघातकी अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे या पक्षाचा पाय अधिक खोलात गेल्याचे दिसून येते. या एका पोटनिवडणुकीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्याचे वजन खर्ची केल्याने राष्ट्रवादीला पर्यायी नाईक यांना नवी मुंबईतून उखडून टाकण्याचे त्यांचे स्वप्न अखेर पुन्हा अपुरे राहिले.
रविवारी प्रभाग क्रमांक सहामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या संध्या यादव ७८६ मतधिक्याने निवडून आल्या. त्यामुळे यादव नगरात माजी नगरसेवक रामआशीष यादव यांची पुतनी निवडून आल्याने त्यांचे अस्तित्व कायम असल्याचे स्पष्ट झाले.
शिवसेना भाजपाकडे उमेदवार नसल्याने काँग्रेसच्या मधुमती पाल यांना अपक्ष उभे करून युतीने पांठिबा दिला. त्यामुळे त्यांना तीन पक्षांची मते मिळाल्याने मागील निवडणुकीपेक्षा जास्त मते पडली. यासाठी गेली तीस वर्षे छुप्या पद्धतीने करण्यात आलेले सर्व प्रयोग काँग्रेस शिवसेना भाजप या युतीने या ठिकाणी जाहीरपणे केले.
पालिकेत काँग्रेसला उपमहापौर पद देऊन सत्तेत राष्ट्रवादीने सामील करून घेतले आहे. नवी मुंबईत काँग्रेसचा शिवसेना-भाजप हे धर्मवादी राजकीय पक्ष विरोधक नसून माजी मंत्री गणेश नाईक हे प्रमुख शत्रू आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशामुळे काँग्रेसने पालिकेत राष्ट्रवादीबरोबर घरोबा केला आहे, पण हे दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नाईक यांना चारीमुंडय़ा चीत करण्यासाठी हे तीन प्रमुख पक्ष एकही संधी सोडत नाहीत.
बेलापूर विधानसभा निवडणुकीतही शेवटच्या क्षणाला काँग्रेसने स्वत:चे उमेदवार नामदेव भगत यांना त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी तोंडघशी पाडले होते. यामागे नाईक यांना पराभूत करणे इतकीच खेळी होती. ती यशस्वी झाल्याने या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षाच्या प्रमुख जिल्हा नेत्यांनी ही झोपडपट्टी भागातील एक पोटनिवडणूक वाजवीपेक्षा प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते या प्रभागात हजेरी लावून गेले होते. लागोपाठ दोन पोटनिवडणूक जिंकून राष्ट्रवादीने शहरातील प्राबल्य स्पष्ट केले आहे.
यानंतर होणाऱ्या पोटनिवडणुका व सार्वत्रिक निवडणुकीत असणारा ट्रेंड या छोटय़ाशा निवडणुकीने दिसून आला असून काँग्रेस शिवसेना भाजपाला तर भाजपा शिवसेना काँग्रेसला पाठिंबा देणार असून नसलेली एक मैत्री या ठिकाणी स्थापित झाली आहे.