01 March 2021

News Flash

महाविकास आघाडीत खदखद

कॉँग्रेसच्या बैठकीत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा सूर

(संग्रहित छायाचित्र)

कॉँग्रेसच्या बैठकीत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा सूर

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांना कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडी करण्यावर राज्य पातळीवरील नेत्यांचे एकमत झालेले असताना स्थानिक पातळीवर त्याला सुरुंग लावण्याचे काम सध्या सुरू आहे. सोमवारी नेरु़ळ येथे झालेल्या काँग्रेसच्या विभाग कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही तर स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा सूर आळवला गेला तर वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण पुनर्प्रवेश सोहळ्यावरून निर्माण झालेला उपनेते विजय नाहटा व शहरप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यातील वादावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पडदा टाकण्यात यश आले आहे.

नवी मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली असून राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे या पक्षातील स्थानिक नेत्यांचा उत्साह वाढला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून कायम राहिला असला तरी महाविकास आघाडीच्या एकीची ताकद स्पष्ट झाली आहे.

हेच समीकरण नवी मुंबई, वसई विरार, औरंगाबाद आणि कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी अमलात आणण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय झाला आहे. गेल्या वर्षी होणाऱ्या नवी मुंबई पालिका निवडणुकीत तर नवी मुंबईतील महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचे प्रभाग वाटपदेखील झालेले आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक एक वर्षे पुढे ढकलली गेली असून या निवडणुकीचा आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख आणि मनसे, आप, एमआयएम, वंचित आघाडी या पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. एकेकाळी ठाणे, नवी मुबंईत एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेस पक्षाची नवी मुबंईत अत्यंत दुरवस्था आहे.

स्वबळावर निवडून येणारे काही नगरसेवक या पक्षात आतापर्यंत टिकून आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीत १११ पैकी केवळ दहा नगरसेवक निवडून आलेल्या या पक्षाला तात्कालीन नाईकांच्या राष्ट्रवादीने सामावून घेतल्याने उपमहापौर पद पदरात पडू शकलेले होते. या पक्षाला यंदाच्या निवडणुकीत २० ते २२ प्रभागांची मागणी आहे. मागील निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचे प्रभाग कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र शिवसेनेचे बालेकिल्ला असलेले प्रभाग सोडण्यास तयार नसल्याने या पक्षाची पंचाईत झाली आहे.

नेरुळ पश्चिम भागात शिवसेनेचे प्राबल्य असून हे प्रभाग काँग्रेसला हवे आहेत. या विभागातील काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी यांची पूर्व भागातील दोन प्रभागात गेली अनेक वर्षे सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे प्रभागवाटपात सोडले जाणार असून इतर प्रभागांचा साधा विचार देखील करण्यात आलेला नाही. त्यामुळे सोमवारी झालेल्या एका बैठकीत इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी ठरवून अध्यक्ष अनिल कौशिक व प्रभारी तारीक फारुक यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.

गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना किमान पालिका निवडणुकीत न्याय मिळणार नसेल तर पक्षाने सर्व प्रभागात उमेदवार उभे करावेत अशी ही भूमिका होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थानिक पातळीवर सुरुंग लागत असून कार्यकर्त्यांत खदखद सुरू झाली आहे. हीच भावना शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

शिवसेनेतील अंतर्गत वादावर पडदा?

आघाडीबाबत काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झालेली असतानाच मध्यवर्ती कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यावरून  शिवसेनेते दोन आठवडय़ांपूर्वी उपनेते विजय नाहटा आणि शहरप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यातील वादावर पडदा टाकण्यात पालकमंत्री शिंदे यशस्वी झाले आहेत. यात पक्षप्रमुख व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याचे समजते. हा वाद वरकरणी थंड झाला असला तरी त्याची धग कायम असल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 1:48 am

Web Title: congress may contest alone navi mumbai civic polls zws 70
Next Stories
1 डिझेलवरील बस ‘सीएनजी’त रूपांतरीत
2 पती-पत्नीमधील वादाच्या ६३३ तक्रारी
3 पनवेल, उरणमध्ये महाविकास आघाडीची सरशी
Just Now!
X