मुख्य प्रवेशद्वारातूनच घुसखोरी

नवी मुंबई नवी मुंबई परिसरात मोठय़ा प्रमाणात विविध ठिकाणी तोडलेल्या बांधकामांचा कचरा (डेब्रिज) टाकण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या डेब्रिजबाबत ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी वृत्त देऊन महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन या प्रकारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीसही पाठविण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या कारवाईनंतर पुन्हा हा बांधकामाचा कचरा टाकण्याचा प्रकार छुप्या पद्धतीने पुन्हा सुरू झाला असून तो टाकण्यासाठी नवनवीन शक्कल लढविली जात आहे. हा कचरा मैदाने, किनाऱ्यांच्या ठिकाणी टाकला जात असल्याने या ठिकाणांना बकालावस्था निर्माण झाली आहे.

सध्या सीवूड्स येथील तांडेल मैदानात बांधकामाचा कचरा टाकला जात आहे. हा कचरा टाकला जाऊ नये यासाठी मैदानात गाडय़ांसाठी येणाऱ्या मार्गावर पोकलेनने खोदून चर बनवले आहेत. त्यामुळे कचरा टाकणाऱ्या गाडय़ांना प्रतिबंध बसला आहे. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे चर नसल्याने तो मार्ग त्यांच्यासाठी खुला आहे. या ठिकाणी सकाळी मोठय़ा प्रमाणात क्रिकेट खेळाडूंची गर्दी असते. तसेच या ठिकाणी  सोमवारी शेतकरी आठवडा बाजार भरतो. हे प्रदर्शनी मैदानही  असल्याने तेथे विविध कार्यक्रम व लग्नसमारंभ होतात. त्याचाच फायदा घेत या प्रवेशद्वारा मार्गे गाडय़ा आत आणून येथे कचरा टाकण्यास सुरुवात झाली आहे.  कचरा टाकण्यासाठी नवी शक्कल लढविण्यात आली आहे. यामध्ये कचरा गाडीच्या मागेपुढे दोघे दुचाकीस्वार ठेवले जातात. त्यांना मैदानात अगोदर पाठवून मैदानात आपल्यावर लक्ष ठेवणारे कोणी नाही ना याची खात्री करून घेतात. नंतर गाडीतला कचरा मैदानात उतरविण्याचा प्रकार केला जात असल्याचे येथे सांगितले जाते.

नवी मुंबई महापालिका हद्दीतून डेब्रिज गाडय़ांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व बेकायदेशीरपणे शहरात कोठेही डेब्रिज टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेची दोन डेब्रिजविरोधी भरारी पथके आहेत. वाशी व ऐरोली विभाग कार्यालयांतर्गत व पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत विभाग अधिकाऱ्यांचे त्यांच्यावर नियंत्रण असते. पालिका हद्दीतून जाण्यासाठी या गाडय़ांना परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार या गाडय़ांकडून प्रतिगाडी आकारणी करण्यात येते. तर विनापरवाना डेब्रिज गाडय़ांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाते. शहरात डेब्रिजचे ढिगारे पडत असताना भरारी पथके कोठे भरारी मारत असतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तांडेल मैदानात मुख्य प्रवेशद्वार वगळता इतरत्र प्रवेश करता येईल अशा ठिकाणी चर काढलेले आहेत. पुन्हा येथे जर डेब्रिज टाकले जात असेल तर भरारी पथकाच्या मदतीने कारवाई करण्यात येईल.

    – शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी बेलापूर