रहिवाशांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

बेलापूर येथील आग्रोळी तलावालगत पारसिक हिल टेकडीच्या पायथ्याशी सेक्टर ३० येथे भूमिराज कन्स्ट्रक्शनचे बांधकाम सुरू असून त्यासाठी भूसुरुंगांचे स्फोट केले जात आहेत. या स्फोटांमुळे परिसरातील इमारतींना हादरे बसून त्यांचे नुकसान होत आहे, असे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. रहिवाशांनी या संदर्भात पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

कॉ. भाऊ  पाटील चौकातून पारसिक हिलकडे जाताना पारसिक हिलच्या पायथ्याशी सेक्टर ३० येथे भूमिराज कन्स्ट्रक्शनचे बांधकाम सुरू आहे. पाया खोदण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भूसुरुंगांचा स्फोट करण्यात येत आहे. या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला आग्रोळी गाव आहे. तिथे मोठी नागरी वस्ती आहे. आग्रोळीतील शिवमंदिर परिसरात राहणाऱ्या इमारतींना हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हादरे बसल्यामुळे काही घरांच्या टाइल्सही पडल्या आहेत. परिसरातील नागरिकांनी याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली आहे. योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. येथून काही अंतरावर सिडकोचे मुख्यालय आणि हाकेच्या अंतरावर पोलीस आयुक्तालय आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या निदर्शनास

ही बाब येत नाही का, असा सवाल निर्माण झाला आहे. प्रशासनाने लक्ष न दिल्यास जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

माझे आग्रोळी शिवमंदिराजवळच रो-हाऊस आहे. गेल्या काही दिवसांपासून भूमिराज कन्स्ट्रक्शनच्या बांधकामासाठी स्फोट घडवण्यात येत आहेत. त्याचे इमारतींना हादरे बसत आहेत. माझ्या घराच्या टाइल्सही हादऱ्याने कोसळल्या आहेत.  याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली असून आयुक्तांनी योग्य ती कारवाई करावी.

स्वाती पाठक, बेलापूर  

बेलापूर येथे सुरू असलेल्या कामाबाबत ठेकेदाराकडे विचारणा करण्यात येईल. सिडको, पोलीस आणि पालिकेकडून सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत.

भूपेन शहा, बांधकाम व्यावसायिक