गोविंद डेगवेकर

अजय शंकर गोवारी. राहणार मासवण (जि. पालघर). कामाचे ठिकाण खोपोली. २२ मार्च रोजी सायंकाळी अजयला कळून चुकलं, की उद्या त्याची नोकरी जाणार. त्यामुळे अजयने खोपोली सोडण्याचा निर्णय घेतला आणि गुरुवारी गाव गाठायचे ठरवले. परंतु, सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे पायी प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. या प्रवासात त्याच्याकडे सहा केळी आणि पाण्याच्या तीन बाटल्या आहेत. खिशात काही पैसे आहेत, पण रस्त्यावर खायला काही नाही, अशी अवस्था आहे.

गुरुवार सायंकाळपर्यंत त्याने कल्याणपर्यंतचा साधारण ५५ ते ६० किलोमीटरचा प्रवास पायी करण्याचे ठरवले होते. मनोरला पोचण्यासाठी त्याला पुन्हा तितकाच प्रवास करायचा आहे.

सोमवार उजाडला आणि बांधकाम साइटवरील मेस्त्रीनं त्याला तसं अधिकृतरीत्या सांगितलं आणि अजयच्या उरात उरलेलं धैर्यही गळालं. मेस्त्रीनं त्याला तोवर तग धरून राहण्यासाठी थोडे पैसे दिले होते. ते अजयला ३१ मार्चपर्यंत पुरवायचे होते. परंतु, ३१पर्यंत जाहीर झालेली संचारबंदी १५ एप्रिलपर्यंत वाढल्यानं रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही, हे त्याला लख्ख दिसू लागलं. अजय गुरुवार, २६ मार्च रोजी पहाटे चार वाजता उठला.. तसा तो रात्रभर झोपलेलाच नव्हता.. का, तर त्याला मासवण गाठायचं होतं. घरातल्यांचा फोन आला म्हणून मी खोपोली सोडायचा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले. रस्त्यावर डोळ्यांत पेंग असलेल्या आणि काही जण डुलकीत असलेल्या पोलिसांना चुकवून अजयने साधारण साडेचारच्या सुमारास जुना मुंबई-पुणे महामार्गावर पायी प्रवास सुरू केला. दुपारी अडीचच्या सुमारास तो जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील म्हणजे पनवेल आणि मुंब्रादरम्यानच्या किरवली गावाजवळ पोहोचला होता. आपण कुठे पोचलोय हेही त्याला धड कळत नव्हतं. पण, मासवणच्या दिशेने त्याची आगेकूच सुरू होती. अजय अजूनही चालतच आहे..

त्याच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी. तिच्याच सहा केळी आणि पाण्याच्या छोटय़ा दोन बाटल्या. त्यातली काही केळी अजयला आणखी काही अंतरापर्यंत पुरवायची आहेत. भूक लागल्याची जाणीव झाली तरी तो केळी न खाण्याचा निर्धार करून पाण्यावरच निभवत होता. महामार्गावर त्याच्या नजरेच्या टप्प्यात खाण्यासाठी काहीच दिसत नव्हतं. ना तो ते शोधण्याच्या प्रयत्नात होता. समोर पडलेला महामार्गच केवळ त्याच्या नजरेत भरलेला होता. मार्गात अधेमधे वाहनांना हात दाखवला तरी त्याला कोणी आत घेण्याची शक्यताही धूसरच होती. खोपोली ते पनवेल या टप्प्यात त्याच्याकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नाही.

पनवेलच्या वेशीवर आल्यावर मात्र त्याच्यावर दोन पोलीस धावून आले. काय रे, कुठे? चल हिथून..(दोनचार शिव्या).. अजय म्हणाला, ‘‘काय माहीत, त्यांनी जोरदार लाठी उगारली, पण ती माझ्यावर पडली नाही. पनवेल शहर ते कळंबोलीपर्यंत कुणी असं फारसं अंगावर धावून आलं नाही. दुरूनच पोलिसांनी लाठय़ा उगारून इशारे दिले.’’

त्यानंतर कळंबोली ते तळोजा, तळोजा ते धरणा कॅम्प आणि नंतर किरवलीपर्यंत सुमारे सात किलोमीटरचा अजयचा प्रवास निर्धास्त झाला. त्याला कुणी अडवलं नाही. धरणा कॅम्पजवळ त्याला हातगाडीवर केळी विकणारा दिसला. त्याच्याकडून त्यानं चढय़ा दरानं ती विकत घेतली होती. साधारण ४५ किलोमीटरची पायपीट केल्यानंतर शरीराला जाणवणारा अटळ थकवा अजयच्या चेहऱ्यावर जाणवत होता. त्याच्या एका पायातला बूट मागून फाटलेला होता आणि नाकाभोवती गुंडाळलेला रुमाल मानेवर आल्याने घामाने भिजलेला होता. उन्हात डोळे लाल झाले होते.

कल्याण-शीळ फाटय़ावर आल्यावर अजयने, आता कसं जाता येईल मासवणच्या दिशेनं, असं विचारलं. फाटय़ावर उभ्या असलेल्या एकाने त्याला, ‘यहां से सीधा मुंब्रा जा सकते, नही तो आगे जा के राइट ले के डोंबिवली-कल्याण की तरफ’.. त्यानं पुन्हा त्याला..दहिसर, मिरा रोड..मनोर कहां से नजदीक पडेगा.. असं विचारल्यावर तो उत्तरला.. मालूम नही..’’ अजय त्याला, ‘ठीकहै’ म्हणून उजवीकडे वळला आणि चालू लागला..