अंतर्गत जलवाहिनी बदलल्यानंतरही दूषित पाणीपुरवठा

कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ५ मधील बैठय़ा वसाहतीमध्ये नवीन जलवाहिनी टाकल्यानंतरही दूषित पाण्याची समस्या सुटलेली नाही. हजारो नागरिक दूषित व मलमिश्रित पाणी पीत आहेत. शुद्ध पाणी हा नागरिकांचा अधिकार आहे व तो मिळालाच पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अडीच कोटी रुपये खर्च केल्यानंतरही ही समस्या सुटलेली नाही.

शहरातील मुख्य जलवाहिनी बदलल्यानंतर ही समस्या सुटेल अशी अपेक्षा आहे, मात्र सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे नवीन जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव स्थानिक पाणीपुरवठा विभागाने सप्टेंबर महिन्यात दिला असला, तरी या प्रस्तावाला अद्याप गती मिळालेली नाही.  पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिलेल्या आदेशामुळे ‘केएल वन’ या बैठय़ा वसाहतीमधील नागरिकांचे हाल माध्यमांनी उजेडात आणल्यानंतर वसाहतीमधील अंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च त्यासाठी करण्यात आला. जलवाहिनीसोबत नवीन जलमापके (मीटर) बसविण्यात आले.

‘केएल वन’ येथील बैठय़ा वसाहतीमध्ये अशाच प्रकारे ३० लाख रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी भूमिगत करण्यात आली. मात्र अंतर्गत जलवाहिनी बदलल्यानंतरही पाण्यातून दुर्गंधी येण्याची समस्या सुटलेली नाही. सध्या ‘केएल वन’ येथील नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. कावीळ  व टायफाईडचे रुग्ण वाढले आहेत. प्रत्येक तीन  घरांमध्ये एक रुग्णसंख्या या परिसरात आहे.

सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळा एक तासासाठी पाणीपुरवठा या परिसरात होतो.पाणीपुरवठा झाल्यानंतर नळाला येणाऱ्या पाण्यापासून दर्प येत असल्याने सुरुवातीची पंधरा मिनिटे पाणी वाया जाऊ दिले जाते. त्यानंतर स्वच्छ पाणी येण्याची सुरुवात झाल्यानंतर येथील गृहिणीपाणी भांडय़ामध्ये भरून ठेवतात. साठविलेले पाणी त्यानंतर उकळून  पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरले जाते. दूषित पाण्याच्या या त्रासामुळे हजारो लिटर पाणी दररोज वाया जाते. या सर्व प्रकारामुळे गृहिणी त्रासल्या आहेत.

जलवाहिनी बदलण्याचा प्रस्तावाकडे दुर्लक्ष सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने मुख्य जलवाहिनी नव्याने बदलण्याचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून दिल्यानंतरही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च असलेल्या कामाचा प्रस्ताव अजूनही सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या टेबलावरच प्रवास करत असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

येथील महिला संतापलेल्या आहेत. अनेक तक्रारी सिडको दरबारी केल्यानंतरही प्रश्न सुटत नाहीत अशी स्थिती आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी अडीच कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी टाकल्यानंतरही मलमूत्राचे पाणी आजही घरांमध्ये येत आहे. सिडकोच्या वरिष्ठांनी एकदा तरी या वसाहतीमधील गृहिणी व लेकरे कशी जगतात ते पाहायला आल्यास त्यांना येथील नागरिकांच्या भावना कळतील.

-सतीश पाटील, नगरसवेक, पनवेल पालिका

सिडकोने या ठिकाणी जलवाहिनी बदलण्याचे काम केले आहे. वसाहतीलगतच्या मुख्य जलवाहिनीमधून पाणी दूषित झाल्याची शक्यता आहे. संबंधित जलवाहिनी बदलण्याचा नवीन प्रस्ताव बनविलेला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कामाची सुरुवात होईल.

-गजानन दलाल, कार्यकारी अभियंता, सिडको पाणीपुरवठा विभाग