पनवेल : शहर महापालिका वीज विभागातील अधिकाऱ्याला करोनाची लागण झाल्यानंतरही या अधिकाऱ्याने विलगीकरण कक्षासाठी आवश्यक असलेल्या गरम पाण्यासाठी ३६ यंत्रे बसवून देण्याच्या कामाला प्राधान्य दिले. लक्षण नसल्याने सुट्टीवर न जाता घरातून काम केले. करोनाविरुद्धच्या लढाईत पालिकेला साथ देण्याचा निर्धार व्यक्त केल्याने करोनायोद्धय़ांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

गेले १०० दिवस पनवेल पालिकेच्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यानी आठवडा सुट्टी न घेता करोना संकटात पनवेलकरांची सेवा करीत आहेत. यात स्वच्छता दूत, आरोग्य सेवक, डॉक्टर आणि अभियंता यांची मोठी फळी काम करीत आहे.

पालिकेत सध्या दोन हजार कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे तीनशे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरील ताण वाढला आहे. करोनाकाळात हा ताण पूर्वीपेक्षा दुपटीने वाढला आहे. तीन दिवसांपूर्वी याचा प्रत्यय नवीन आलेल्या आयुक्त सुधाकर देशमुख यांना आला. पालिकेच्या वीज विभागातील एका अधिकाऱ्याला लागण झाली. त्यानंतर या अधिकाऱ्याने मागे न हटता रुग्णांसाठीच्या सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले.

तपासणीनंतर करोना आढळल्यानंतरही अगोदर पालिकेने उभारलेल्या इंडीया बुल येथील करोना विलगीकरण कक्षातील रुग्णांसाठी आवश्यक गरम पाण्यासाठी ३६ यंत्रे लावण्याचे काम या अधिकाऱ्याने पूर्ण केले. लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही घरातूनच उपचार घेण्यास प्राधान्य दिले. याशिवाय घरातून पालिकेच्या वीज विभागाचे काम करण्यास सुरुवात केली. याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.