नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा १४ महिन्यांचे वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिका मुख्यालयावर गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. या वेळी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नेतृत्व केले. यावर पालिका आयुक्तांनी येत्या तीन आठवडय़ांत वेतन देण्यात येईल, असे सांगितले.

नवी मुंबई महापालिकेत घनकचरा, मलनिस्सारण, विद्युत, पाणी पुरवठा अशा विविध १७ विभागात ६,५०० कंत्राटी कामगार काम करीत आहेत.  कामगारांचे १४ महिन्यांच्या थकीत किमान वेतनाचा फरक ९० कोटी रुपये आहे. हे वेतन देण्याबाबत सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिलेली आहे, मात्र प्रत्यक्षात ते देण्यात आले नाही. याबाबत याआधी अनेकदा निवेदने अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा दावा मनसेने केला. मात्र वेतन फरक मिळत नसल्याने अखेर गुरुवारी सीवूड्स दारावे स्थानक ते पालिका मुख्यालयापर्यंत थाळी नाद मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दीड ते दोन हजार कामगार उपस्थित होते. मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना भेटल्यावर त्यांनी तीन आठवडय़ांच्या आत हे थकीत वेतन दिले जाईल असे आश्वासन लेखी दिल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

तर मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले की, थकीत वेतन फरकबाबत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली असून त्याला सर्वसाधारण सभेची मंजुरीची घेण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणी दूर होताच हा वेतन फरक देण्यात येईल.