डहाणूसारख्या दुर्लक्षित भागात शिक्षण पूर्ण करून पदविका घेऊन उद्योजक होण्याचे स्वप्न दिवंगत प्रदीप चुरी यांचे चिरंजीव वैभव चुरी यांनी पूर्ण केले आहे. वडिलांच्या उद्योगात वेगवेगळे प्रयोग करून नवीन उत्पादन घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मोठय़ा कंपन्या जे निर्माण करू शकतात ते आपणही करायला हवे, असे त्यांना वाटते.

वीज, पोलाद अथवा सिमेंट उद्योगासाठी इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल बनविण्याचे काम चुरी यांच्या टेक्निट्रॉन या कंपनीत गेली ३० वर्षे केले जात आहे. १० लाखांची वार्षिक उलाढाल असलेला हा उद्योग आता बहरला असून ५५ कामगारांचा उदरनिर्वाह या लघुउद्योगावर अवलंबून आहे. सिमेन्स आणि एल अ‍ॅन्ड टीसारखे मोठे उद्योगसमूह जे उत्पादन घेतात ते उत्पादन स्वत: तयार करण्याची इच्छाशक्ती वैभव चुरी यांच्यात आहे. त्यासाठी लागणारी प्रचंड मेहनत करण्याची, कौशल्य आत्मसात करण्याची तयारीही आहे.

सत्तरच्या दशकात नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक वसाहतीत अनेक कारखाने उभे राहिले. तेव्हा रस्त्यांचे जाळे अन्य पायाभूत सुविधांची कमकरता होती. ठाणे-बेलापूर मार्गावर प्रवास करणे ही तारेवरची कसरत मानली जात होती. तरीही ठाणे, मुंबईतून अनेक नवउद्योजक आपले नशीब आजमावण्यासाठी दररोज द्रावीडी प्राणायाम करत या उद्योगनगरीत येत होते.

त्यात प्रदीप व किरण चुरी या दोन भावांचादेखील समावेश होता. पदविका घेतल्यानंतर प्रदीप चुरी नोकरीनिमित्त मस्कतला गेले. पहिल्यापासून इंजिनीअिरग ड्रॉईंगमध्ये रस असलेल्या चुरी यांनी मेकॅनिकल डिप्लोमा केला होता. त्यामुळे मस्कतमध्ये चांगलाच जम बसला. दोन पैसे गाठीशी बांधल्यानंतर भारतात उद्योग करण्याचा विचार त्यांनी सुरू केला. पण इराक-इराणमध्ये युद्धाचे ढग जमू लागल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

दोन भावांनी आडवाणी नावाच्या एका मित्राला सोबत घेऊन रबाळे एमआयडीसीत दोन कारखाने सुरू केले. मोठय़ा उद्योगांना लागणारे इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल बनविण्याचा हा कारखाना हळूहळू आपला जम बसवू लागला.

एल अ‍ॅण्ड टी, सिमेन्स, एबीबी या कारखान्यांना मिळणाऱ्या या ऑर्डर ते या लघु कारखानदारांकडून करून घेत होते. त्यामुळे या कारखान्यांचे सर्व निकष सांभाळणे हे एक मोठे आव्हान होते. त्यावेळी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच कारखाने हे इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनल बनवत होते. त्यामुळे टेक्निट्रॉनला टाटा स्टील, भूषण स्टील, जीएसडब्लू या मोठय़ा कारखान्यांच्या कंट्रोल पॅनलच्या ऑर्डर मिळू लागल्या. स्टिल उत्पादन उद्योगातील या कारखान्यांबरोबच सिमेंट उद्योगातील अग्रगण्य कारखाने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबुजा, दालमिया एल अ‍ॅण्ड टी या कारखान्यांनाही टेक्निट्रॉन सेवा देऊ लागले.

उत्पादनाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे दोन भावांनी उद्योगाचा विस्तार केला. प्रदीप चुरी यांनी सव्वीस वर्षांपूर्वी टेक्निट्रॉनची स्थापना केली. बी. ई. मेकॅनिकल पदवी घेऊन वैभव चुरी यांनी बारा वर्षांपूर्वी वडिलांच्या उद्योगाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. हा उद्योग अधिक कसा वाढविता येईल याचा अभ्यास या नवीन पिढीने सुरू केला.

वैभव यांनी वडिलांच्या उद्योगाचा विस्तार करताना सिमेन्स, एल अ‍ॅण्ड टी यांच्याप्रमाणेच स्वत: उद्योग नव्या उंचीवर नेण्याचे स्वप्न वैभव चुरी यांनी बाळगले आहे.

पावडर कोटिंग विभाग

उद्योगाचा पसारा आणखी वाढवण्यासाठी कंट्रोल पॅनलला लागणारे लोखंडी बॉक्स तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी पावडर कोटिंगचा नवीन विभाग सुरू करण्यात आला. त्यासाठी लागणारी यंत्रणा बेल्जियम आणि चीनमधून आयात करण्यात आली.