23 July 2019

News Flash

अवजड वाहनांच्या परवान्यांना जाचक अटींचे ग्रहण

वाहनांना जीपीएससह प्रशिक्षण केंद्राकडे ५ किलोमीटरचा ट्रॅक असणे बंधनकारक असून ते कोणत्याही केंद्राकडे उपलब्ध नाही.

(संग्रहित छायाचित्र)

संतोष जाधव

सहा महिन्यांत शहरात एकही परवाना नाही

मोटर वाहन कायद्यात सहा महिन्यांपूर्वी काही बदल केले असून यातील अटींमुळे वाहनचालकाला अवजड वाहन परवाना काढणे अशक्य होत आहे. नवी मुंबईत तर एकही परवाना काढला गेला नाही. वाहनांना जीपीएससह प्रशिक्षण केंद्राकडे ५ किलोमीटरचा ट्रॅक असणे बंधनकारक असून ते कोणत्याही केंद्राकडे उपलब्ध नाही.

यापूर्वी हा परवाना काढण्यासाठी सुरुवातीला नवी मुंबई शहरात वाहन चालविण्याचे केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर ५ क्रमांकाचा अर्ज सादर केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत वाशी ट्रक टर्मिनल्स तसेच शहरातील वर्दळ नसलेल्या रस्त्यावर चाचणी घेऊन हा जड वाहन परवाना दिला जात असे. सहा महिन्यांपूर्वी मोटर वाहन कायद्यात हा परवाना देण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.

यात वाहन प्रशिक्षण केंद्राकडे ५ किलोमीटरचा जड वाहन चालवण्याचा ट्रॅक असणे गरजेचे आहे. तसेच प्रशिक्षण दिले जात असताना त्या वाहनाला जीपीआरएस असणे आवश्यक आहे. गाडीचे अ‍ॅव्हरेज, इंधन कार्यक्षमताही गरजेची आहे. नवी मुंबई शहरात ५ किमीटरचा असा ट्रॅक उपलब्ध करून देणे वाहन प्रशिक्षण केंद्राना शक्य नाही. तसेच प्रशिक्षणसाठी वापरण्यात येणाऱ्या गाडीचे जीपीआरएसनुसार सर्व माहितीची गुगल प्रिंट काढून ती ५अ फॉर्मसोबत लावून द्यायची आहे. त्यानंतरच उपप्रादेशिक कार्यालयामार्फत परवाण्यासाठीची चाचणी झाल्यानंतरच जड वाहन परवाना प्राप्त होणार आहे. परंतु या अटींची पूर्तता अशक्य झाल्याने गेल्या सहा महिन्यांत शहरात एकही जड वाहन परवाना दिला गेला नाही.

प्रशिक्षण केंद्रांना एवढा मोटा ट्रॅक कसा मिळणार, असा सवाल प्रकाश खलाटे व अशोक राठोड या प्रशिक्षण केंद्राच्या चालकाने केला असून शासनानेच तो उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

मोटर वाहन कायद्यात नव्याने करण्यात आलेल्या तरतुदीमुळे मोटर प्रशिक्षण केंद्राकडून इंधन कार्यक्षमता प्रमाणपत्र लावणे गरजेचे आहे. तसेच ५ किलोमीटरचे टेस्टिंग ट्रॅक असणे आवश्यक आहे. परंतु तशा प्रकारची सुविधा येथे उपलब्ध नसल्याने शहरात ६ महिन्यांपासून एकही जड वाहन परवाना दिला गेला नाही.

-दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई.

First Published on March 15, 2019 1:23 am

Web Title: conviction of heavy vehicle licenses