सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हस्तक्षेपामुळे प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या प्रभाग समित्यांच्या रचनेला राज्य शासनाने स्थगिती दिली असल्याने मागील एक वर्षांत नगरसेवकांच्या प्रभागात एक छदामही खर्च झालेला नाही. त्यामुळे संतप्त शिवसेना नगरसेवक शुक्रवारी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना जाब विचारणार आहेत. पालिकेतील एकूण १११ नगरसेवकांसाठी आठ प्रभाग समित्यांची रचना करण्यात आली असून, ती सत्ताधारी राष्ट्रवादीने आपल्या सोयीनुसार केल्याने आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेल्या तक्रारीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या रचनेला गतवर्षी जुलै महिन्यात स्थागिती दिली आहे. या वादात नगरसेवक निधीचे ५५ कोटी मार्चअखेर वाया गेले आहेत.

नवी मुंबई पालिकेच्या गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक आयोगाने शहराची लोकसंख्या वाढल्याने ८९ नगरसवेक संख्या १११ पर्यंत वाढविली. यात राष्ट्रवादी आणि अपक्ष ५७, शिवसेना ४४ आणि काँग्रेस १० असे संख्याबळ तयार झाले आहे. चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत पालिकेत ८९ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने सहा प्रभाग समित्यांची रचना करण्यात आली होती मात्र गतवर्षी ही संख्या १११ झाल्याने प्रभाग समित्यांची संख्या आठ करण्यात आली आहे. जुलै महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत ह्य़ा आठ प्रभाग समित्यांची रचना सभागृहात पटलावर ठेवण्यात आली होती. त्यावर विरोधक शिवसेना, भाजपने आक्षेप घेतला. ही रचना पूर्वीप्रमाणे नसून त्यात फेरफार करण्यात आले असून राष्ट्रवादीने आपल्या सोयीनुसार रचना केली आहे, असे विरोधकांचे मत आहे. जुन्या रचनेनुसार आठ प्रभाग समित्यांपैकी दोन प्रभाग समित्या ह्य़ा शिवसेना, भाजपच्या वाटय़ाला येणार होत्या. पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे पचनी पडत नाही. त्यामुळे त्यांनी सर्व समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील या उद्देशाने प्रभाग समित्यांची रचना केली असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. राष्ट्रवादीच्या या खेळीविरोधात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी पक्षाच्या या दबंगगिरीला स्थागिती दिली. यामुळे गेले वर्षभर प्रभाग समित्या अस्तित्वात येऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे प्रभाग समितीत होणाऱ्या नागरी कामांना सध्या मंजुरी मिळालेली नाही. या प्रभाग समित्यांना स्थगिती असल्याने नगरसेवकांच्या प्रभागात होणारी नागरी कामे रखडली असून, यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचाही पारा चढला आहे.

यामुळे एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या एका वर्षांतील नगरसेवक निधी माघारी गेला आहे. प्रत्येक नगरसेवकाला नवी मुंबईत दहा लाख रुपये नगरसेवक निधी असून प्रभाग समितीत ४४ कोटी रुपयांची कामे करून घेण्याची संधी आहे. त्यामुळे प्रभाग रचना वादात नगरसेवकांचे आर्थिक वर्षांत ५५ कोटी रद्द झाले असून, साधी गटारावरील झाकणे बदलता येत नसल्याची खंत नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरी समस्यांची तक्रार करणाऱ्या काही सुज्ञ नागरिकांपासून नगरसेवकांना तोंड लपवून पळण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना, भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी आयुक्त दिनेश वाघमारे यांना जाब विचारण्याचे ठरविले आहे.

सत्तेत राहून विरोध करण्याची वेळ

आमच्या प्रभागात मागील एक वर्षांत नागरी कामांवर शून्य पैसे खर्च केले गेले नाहीत. त्यामुळे एक प्रकारचा डेटलॉक तयार झाला आहे. प्रशासनाने पाच लाख रुपये खर्चाची कामे करण्याचे आदेश दिले आहेत नगरसेवकांच्या हक्काच्या निधीवर गदा आली आहे. लोकांना कामे होण्याशी मतलब आहे. आमचे वाद आम्ही मिटविण्याची गरज आहे. वर्षेभर प्रभागात नागरी कामे झाली नाहीत ज्यांनी निवडून दिले आहे. त्यांना उत्तरे कशी द्यायची असा प्रश्न पडतो.

दिव्या वैभव गायकवाड, नगरसेविका, वाशी, पक्ष- राष्ट्रवादी

मतदारांना धडा शिकविण्याचा प्रयत्न

लोकसभा, विधानसभा निवडणूकीत येथील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नाकारले आहे. पालिका निवडणूकीत बहुमत दिलेले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कुबडय़ा घ्यावा लागल्या असल्याने संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जाणूबजून प्रभाग रचना चुकीची केली असून प्रभाग समित्यांना खो घालण्यात आला आहे. हा नागरीकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न असून मतदारांवर वचपा काढला जात आहे. स्मार्ट सिटीच्या प्रस्तावालाही असाच विरोध केला गेला आहे. आम्हाला निवडून न दिल्याने कामे होणार नाहीत असा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे.

किशोर पाटकर, शिवसेना नगरसेवक, वाशी