नवी मुंबई : वडिलांच्या शस्त्रक्रियेचे वैद्यकीय देयक कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजारांची लाच मागणाऱ्या महिला लिपिकास लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली असून आरोपीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी या पोलीस कर्मचारीच असून त्यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याचे देयक महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतर्गत मंजूर करण्यात आले होते.

मात्र सदर देयक कोषागार कार्यालयात पाठवल्यानंतर ते संबंधित व्यक्तीला देण्यात येते. हे देयक कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात काम करणाऱ्या कनिष्ट लिपिक मीनाक्षी खोब्रागडे यांनी फिर्यादीकडे आठ हजारांची लाच मागितली होती. या बाबत नवी मुंबई लाच लुचपत विभागाकडे ३० ओक्टोबर रोजी तक्रार करण्यात आली.  त्यानंतर याबाबत तपास करून शहानिशा केली असता आठ हजारांची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार खोब्रागडे यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा तपास  पोलीस निरीक्षक अश्विनी कुसुरकर यांनी केला, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली.