इमारती, गृहसंकुलांत करोना रुग्णवाढ कायम

नवी मुंबई</strong> : करोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेतही करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात शहरातील झोपडपट्टी असलेला भाग आघाडीवर आहे. इमारती, गृहसंकुलांत आजही करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत असून झोपडपट्टीत ही संख्या त्या तुलनेत अगदीच कमी आहे.

तुर्भे व अन्य झोपडपट्टी भागात परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आहे. इंदिरानगर परिसरात फक्त २ उपचाराधीन रुग्ण आहेत. तर उत्तुंग इमारती व नियोजित उपनगरांमध्ये करोना रुग्णांची संख्या कित्येक पटीत जास्त आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत झोपडपट्टी परिसर असलेल्या तुर्भे पॅटर्नची चर्चा होती.

शहरात आठ विभाग कार्यालये आहेत. त्यामध्ये तुर्भे, सानपाडा विभागासाठी असलेल्या तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या तुर्भे परिसरात शहरातील मोठी झोपडपट्टी आहे. तुर्भे विभागात पालिकेची चार नागरी आरोग्य केंद्रे आहेत. त्यामध्ये तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, पावणे तसेच सानपाडा या परिसरात शहरातील मोठी लोकसंख्या झोपडपट्टी परिसरात वास्तव्यास आहे. अतिशय दाटीवाटीचा असा हा परिसर आहे. त्यामुळे धारावीप्रमाणे या परिसरातही पहिल्या लाटेत मोठी रुग्णवाढ झाली होती. मात्र पालिका प्रशासनाने आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून विशेष लक्ष देत येथील परिस्थिती नियंत्रणात आणली होती. तुर्भे झोपडपट्टी परिसरात पालिका अधिकारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, स्थानिक सामाजिक संस्था व विविध समाजसेवकांच्या मदतीने करोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणले होते. दुसऱ्या लाटेत सर्वच ठिकाणी रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली असताना शहरातील झोपडपट्टी परिसरात मात्र करोनाची स्थिती नियंत्रणात आहे.

तुर्भे स्टोअर व इंदिरानगर परिसरात रुग्ण संख्या कमी झाली आहे. तर शहरी भागात मात्र अद्यापही करोना उपचाराधीन रुग्ण जास्त आहेत. गरीब नागरिक नियम पाळतात. खाटांचा तुटवडा जाणवत असताना आपण आजारी पडल्यावर खाट कुठून मिळणार? उपचारासाठी खर्च कोण करणार? या भीतीपोटी करोना नियमावलीचे ते काटेकोर पालन करतात. यामुळे या भागात लवकर नियंत्रण मिळवता आले आहे. तुर्भे स्टोअर, इंदिरानगर परिसरातही एक अंकी उपचाराधीन रुग्ण सापडत आहेत. शहरी भागात करोना नियमावली न पाळण्याचे प्रकार अधिक समोर येत असल्याने रुग्णवाढ होत असल्याचे तुर्भे-सानपाडा विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी सांगितले.

पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही झोपडपट्टी भागातील करोना स्थिती नियंत्रणात असल्याबाबत समाधान व्यक्त करीत शहरी भागातील नागरिकांना करोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

तुर्भे पॅटर्न

‘धारावी पॅटर्न’प्रमाणे नवी मुंबईत ‘तुर्भे पॅटर्न’ची चर्चा आहे. या भागात करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त रुग्णांना वेळीच वेगळे करण्यात येते. घरोघरी जाऊन तपासणी, मदत कक्षातून सतत संपर्क, ६० पेक्षा अधिक वयोगटावरील नागरिकांची माहिती अशा विविध उपाय करून या भागातील करोना संसर्ग नियंत्रणात आणला जात आहे.

नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

इमारती, गृहसंकुलांत करोनाची गंभीर परिस्थिती असतानाही नागरिक सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी जात आहेत. आशाच एका फेरफटका मारणाऱ्या नागरिकाकडे नियम मोडल्याने पालिकेने ५०० रुपये दंड आकारला. तर त्याने माझ्याकडून ५०० रुपये नाहीत ५ हजार रुपये घ्या..असा उर्मटपणा दाखवला. त्यामुळे असे पैसे दाखवून नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.