नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कार्यरत असलेले ३२ पोलीस कर्मचारी शुक्रवारी निवृत्त होत असून पोलिसांच्या इतिहासात प्रथमच त्यांची निवृत्ती प्रक्रिया आणि कार्यक्रम ऑनलाइन पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी सर्वांशी ऑनलाइनच संवाद साधला. दरम्यान, करोनाच्या लढाईतील ३२ सैनिक निवृत्त झाल्याने ही पोकळी लवकर भरून काढणे गरजेचे आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयमध्ये काम करणारे एक सहाय्यक पोलीस आयुक्त दोन पोलीस निरीक्षक यांच्यासह एकूण ३२ पोलीस कर्मचारी शुक्रीवारी निवृत्त झाले. एरव्ही निवृत्तीचा जंगी कार्यक्रम घेत त्यांची विदाई केली जात होती. त्यावेळी निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार आयुक्तांच्या हस्ते होत होता. तर त्यांच्या कार्यकाळातील उत्तम कामांचा धावता आढावाही घेतला जात होता. मात्र, यंदा कोरोना या जागतिक महामारीचा नवी मुंबईत झालेला उद्रेक पाहता जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कर्मचार्यांमध्ये काहीशी उदासी दिसत होती.

मात्र, अत्याधुनिक पद्धतीने ऑनलाइन हा कार्यक्रम घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम सुरु झाला निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्याच ठिकाणी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. तर ‘सिस्को वेब पिट’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे एकाच वेळी सर्वच जण एकमेकांना ऑनलाइन पाहू शकत होते. तर शेवटी आयुक्त संजयकुमार यांनी सर्वांशी संवाद साधत विदाई करताना आभार मानले.
विशेष म्हणजे निवृत्तीच्या समारोपप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जसे सर्व निवृत्त कमर्चारी व अधिकाऱ्यांना मानपत्रे व अन्य कागदपत्रे देण्यात येतात ती सर्व कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीनेच देण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष शाखा उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

कमी झालेल्या मनुष्यबळाची पोकळी भरुन काढणे आवश्यक

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २० लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. त्यांच्या संरक्षणार्थ सुमारे ४ हजार ५०० पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत. करोनाच्या आधीच हे मनुष्यबळ कमी होते त्यात आता तर करोनाविरोधताली लढाईत अतिरिक्त मनुष्य बळ आवश्यक आहे. त्यातच हे अधिकारी कर्मचारी निवृत्त झाल्याने अगोदरच कमी मनुष्यबळ असलेल्या नवी मुंबई पोलिसांना यांची पोकळी लवकर भरून काढणे आवश्यक आहे. ही लढाई करोनाविरोधी असल्याने ५५ वर्षावरील पोलिसांना फारच आवश्यक असेल तर आणि पूर्ण सुरक्षित असेल तेथेच कर्तव्यावर पाठवण्यात येत होते. त्यामुळे आता यातील शारिरिक क्षमता उत्तम असलेल्यांना करोनामुळे एक्सटेन्शन देता येणे शक्य नाही.