अखेर विभाग अधिकाऱ्यांची नियुक्ती

नवी मुंबई</strong> : शहरातील करोना अतिसंक्रमित उपनगर असलेल्या नेरुळला अखेर विभाग अधिकारी मिळाले. अनुप दुरे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत करोना संसर्ग वाढत असताना या विभागासाठी महत्त्वाचे असलेले हे पद रिक्त होते. तर तात्पुरत्या स्वरूपात दिलेले अधिकारीही करोनाबाधित झाले होते.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली, दिघा ही आठ विभाग कार्यालये आहेत. यात सर्वाधिक करोनाबाधित हे नेरुळ विभागात आहेत. शहरात ३३ प्रतिबंधित क्षेत्र असून त्यातील १७ प्रतिबंधित क्षेत्र एकटय़ा नेरुळ विभागातच आहेत. विशेष म्हणजे या विभागातील झोपडपट्टी भागात करोना नियंत्रित असून मोठय़ा सोसायटय़ांमध्ये करोनाने घरोबा केला आहे. नवी मुंबईतील हे सर्वाधिक मोठे उपनगर असून ३२ सेक्टरमध्ये सव्वा दोन लोकसंख्या आहे. नेरुळ, शिरवणे, कुकशेत, सारसोळे ही मोठी लोकसंख्या असलेली गावेही आहेत. नेरुळमध्ये करोनाबाधितांची संख्या सद्य:स्थितीत ६२०० पेक्षा अधिक झाली आहे.

करोनाकाळात या विभागाला महत्त्वाचे असलेले विभाग अधिकारी हे पदच रिक्त होते. त्या जागी पालिका प्रशासनाने तात्पुरते अधिकार देण्यात आलेले अधिकारीच करोनाबाधित झाले होते. त्यामुळे करोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी या विभागात हे पद भरण्याची मागणी होत होती. त्यानुसार या पदावर नवीन अधिकारी देण्यात आले आहेत.

पालिका प्रशासनाने शहरातील नेरुळ, वाशी व ऐरोली या विभागांत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या ठिकाणी आता लक्ष केंद्रित केले आहे. राज्य शासनाकडून आणखी चार अधिकारी शहरासाठी मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

विभागवार बाधित

नेरुळ : ६२०६

कोपरखैरणे  : ५२५१

ऐरोली : ४७५९

घणसोली : ४४१५

बेलापूर : ४४६१

वाशी : ३७६१

तुर्भे-सानपाडा :३६२२

दिघा : ९१६

नेरुळ उपनगरात करोना नियंत्रणासाठी कारवाईला सुरुवात करण्यात आली असून करोना नियमावली न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

  – अनुप दुरे, साहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, नेरुळ