महापालिकेच्या नोटीशीनंतरही पनवेलमधील २८ पैकी १३ रुग्णालयांकडे ‘ना हरकत’ दाखला नाही

पनवेल : राज्यात करोना रुग्णालयांत आगीच्या घटना घडल्यानंतर पनवेल पालिका प्रशासनाने शहरातील २८ करोना रुग्णालयांना तातडीने अग्निसुरक्षा यंत्रणेचा ‘ना हरकत’ दाखला घेण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. यातील १५ रुग्णालयांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अद्याप १३ रुग्णालयांना काही त्रुटींमुळे अद्याप हा दाखला मिळवता आला नाही. करोना रुग्णालयांबरोबर इतर रुग्णालयांतही हीच परिस्थिती आहे.

पनवेलमधील २१९ रुग्णालयांपैकी निम्या रुग्णालयांनी अग्निसुरक्षा यंत्रणेचा ‘ना हरकत’ दाखल्याचे नूतनीकरण केले नसल्याचे उजेडात आले आहे. काही रुग्णालयांनी पूर्वीचा दाखला मिळवला असला तरी दर तीन वर्षांनी संबंधित रुग्णालयाचे अग्नी परीक्षण व दरवर्षी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नूतनीकरण केले जाते. पनवेलमधील निम्म्यापेक्षा अधिक रुग्णालयांनी या नियमास बगल दिल्याचे अग्निशमन दलाच्या तपासणीत समोर आले आहे. त्यांना तातडीने अग्निसुरक्षा यंत्रणेचा ना हरकत दाखला घेण्यासाठी पनवेल पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र तरीही अग्निशमन यंत्रणेला प्रतिसाद शून्य आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात लहानमोठी २१९ रुग्णालये आहेत. खारघर हे क्षेत्र सिडको महामंडळाच्या अग्निशमन यंत्रणेकडे येत असल्याने उर्वरित १७१ रुग्णालयांपैकी अनेक रुग्णालयांनी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडे रुग्णालय नोंदणी केली आहे. मात्र संबंधित इमारतीसाठी लागणारा अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दाखला मिळण्याअगोदरच पालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांची नोंदणी पालिकेच्या दफ्तरी करून घेतली आहे. त्यामुळे अनेक रुग्णालये अग्निशमन दलाच्या यंत्रणा कार्यान्वित केल्याशिवाय पनवेलमध्ये सुरू आहेत.

राज्यात करोना रुग्णालयांत आगीच्या घटना घडल्यानंतर पालिका आयुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तातडीने करोना रुग्णांना उपचार देत असलेल्या २८ रुग्णालयांमध्ये अग्निशमन दलाकडून सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या. त्यामध्ये १५ करोना रुग्णालयांनी अग्निशमन दलाच्या सूचनेप्रमाणे सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याचा

दाखला मिळविला. मात्र अजूनही १३ रुग्णालयांपैकी अनेकांनी जुन्या ना हरकत प्रमाणपत्रांवर काही सूचना सुचविल्याने अग्निशमन दलाकडून ना हरकत दाखला मिळविता आला नाही. सध्या करोना संकटकाळात रुग्णालयांमध्ये चालणारी २४ तास वीज व्यवस्था, वातानुकूलित व जीवरक्षक यंत्रणेमुळे रुग्णालयातील विजेचा वापर वाढला असून वीज उपकरणांवर ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णालयांनी अग्निसुरक्षा सुस्थित ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा आगीच्या घटनांचे संकट निर्माण होऊ शकते. निवासी जागेत रुग्णालये

अनेकांनी निवासी वसाहतींमधील ‘रो हाऊस’ एकत्र करून त्यामध्येच रुग्णालये उभारली आहेत. शहरातील एका रुग्णालयाने तर जुन्या नगर परिषदेच्या कालावधीतील लॉजिंग बोर्डिगच्या इमारतीमध्येच रुग्णालय सुरू केले होते. अनेक वर्षे या ठिकाणी रुग्णसेवा दिली, मात्र इमारतीच्या वापरात अजूनही बदल रुग्णालय व्यवस्थापनाने केलेला नाही. अनेक डॉक्टरांनी रुग्णालयातच स्वत:च्या निवासाची सोय केल्याने दुर्घटना घडल्यास असलेल्या अटी- शर्तीचे पालन अनेक रुग्णालयांनी केलेले नाही. आजपर्यंत दुर्घटना घडली नाही म्हणजे पुढेही घडणार नाही, याच आविर्भावात व्यवस्थापन वागत असल्याचे पालिकेच्या तपासणीत उघड झाले आहे.

रुग्णालये सुरू करताना अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्रे घेतली आहेत. मात्र अनेकांनी त्याचे नूतनीकरण केलेले नाही. त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. सध्याची वैद्यकीय सेवेची गरज पाहता या रुग्णालयांवर कारवाई करू शकत नाही. दर तीन वर्षांनी या यंत्रणेची तपासणी आणि दरवर्षी नूतनीकरणे करणे गरजेचे आहे.

– विठ्ठल डाके, उपायुक्त,

पनवेल पालिका