३ लाख ८९ हजार जणांना एक मात्रा

नवी मुंबई : १६ जानेवारीपासून शहरात लसीकरण सुरू झाले असून आतापर्यंत १ लाख ९९६ नागरिकांना लशींच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत तर ३ लाख ८९ हजार ६६५ नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली आहे.

शहरात लसीकरणासाठी पालिकेने ५० केंद्रांचे नियोजन केले आहे. सध्या ३३ केंद्रांवर लसीकरण होत आहे. तसेच विष्णुदास नाटय़गृह येथेही जम्बो लसीकरण केंद्रही सुरू केले आहे. पावसाळ्यातही अडचण येऊ  नये म्हणून पालिकेने लसीकरण केंद्राबाहेर तात्पुरती शेडची व्यवस्थाही केली आहे. ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई लसीकरणात आघाडीवर आहे तसेच नवी मुंबई शहरात लस वाया जाण्याचे प्रमाणही कमी असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण संथ गतीने सुरू आहे.

यासाठी पालिकेने लस खरेदीचीही तयारी केली आहे. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासनाच्या लस उपलब्धतेवर लसीकरण सुरू आहे.

आतापर्यंत शहरातील १ लाख ९९६ नागरिकांना लशींच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत तर ३ लाख ८९ हजार ६६५ नागरिकांना पहिली मात्रा देण्यात आली आहे. जुलैअखेर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लस खरेदीसाठीही पालिका प्रयत्नशील आहे, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.