संतोष सावंत

पनवेल : महापालिका प्रशासनाने उभारलेल्या दोन काळजी केंद्रात गेल्या १४ महिन्यांत २० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यांच्या जेवण व न्याहरीवर २ कोटी ३१ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. मात्र यात मांसाहार तर सोडाच, पण रुग्णांसाठी पौष्टिक असलेले दूध व अंडीही दिली नाहीत, हे उघड झाले आहे.

पनवेल महापालिकेने विलगीकरण केंद्रातील रुग्णांना जेवण आणि न्याहरी पुरविण्यासाठी नव्याने एक निविदा प्रसिद्ध केली होती. हा प्रस्ताव सोमवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिका पुरवत असलेल्या जेवण व न्याहरीच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करीत चांगल्या दर्जाचा आहार पुरवावा अशी मागणी केली होती. त्यानंतर स्थायी समिती सभापतींनी फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले आहेत.

पालिकेने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून कोन येथील इंडिया बुल येथील इमारतीमध्ये काळजी केंद्र सुरू केले तर कळंबोली येथील टीएरा सभागृहातही दुसरे काळजी केंद्र सुरू केले होते. या दोन्ही काळजी केंद्रात आतापर्यंत २० हजार करोना रुग्णांनी उपचार घेतले आहेत. मात्र या रुग्णांकडून घरी परतल्यानंतर सकस आहार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. याबाबत अधिकची माहिती घेतली असता, पनवेल पालिकेने मैत्री कंपनीच्या ठेकेदाराला ८५ रुपयांना एक शाकाहारी थाळी रुग्णांसाठी देण्याचे दर मंजूर केले होते. त्यानुसार रुग्णांना न्याहरीमध्ये नेहमी कांदेपोहे आणि उपमा दिला होता. तर फक्त शाकाहारी थाळी दिली जात होती, तीही बेचव असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यावर पालिका प्रशासनाने ठेकेदाराला आतापर्यंत २ कोटी ३१ लाख रुपयांचे देयक दिले आहे. महिन्याला सरासरी १६ लाख ५० हजारांचा खर्च पालिकेने केला आहे. मात्र यात सकस आहार दिला जात नसल्याचे समोर आले आहे. जेवणातील दर्जा चांगला नसल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी घरूनच जेवण पुरविण्यात धन्यता मानली आहे. मात्र ज्या कुटुंबात सर्वच जण बाधित होते. त्यांना या जेवण व न्याहरीवरच समाधान मानावे लागले आहे.

या तक्रारींची दखल घेत पालिकेने आता नव्याने निविदा काढली असून तो प्रस्ताव सोमवारच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यात एका पुरवठादाराने बाजारात ५ रुपयांना मिळणारे अंडे उकडून ४ रुपयांना देण्यात येईल तर एका ठेकेदाराने थाळी ५० रुपयांना देण्यात येईल, असे निविदेत नमूद केले आहे. मात्र बाजारदरापेक्षा हे दर कमी असल्याने यापुढेही रुग्णांना सकस आहार कसा मिळेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभेत नगरसेवकांनीही यावर आक्षेप घेतल्याने फेरनिविदा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील काळात तरी दर्जेदार व सकस आहार द्यावा अशी मागणी होत आहे. आजही पनवेल पालिकेच्या इंडिया बुल येथील विलगीकरण कक्षात १०२ रुग्ण उपचार घेत आहेत.

नवी मुंबई दररोज दूध, अंडी

पनवेल पालिका प्रशासन नेहमीच नवी मुंबई पालिकेने काढलेले आदेश व कार्यपद्धतीचा अवलंब करते. मात्र विलगीकरण कक्षातील रुग्णांना नवी मुंबईत अंडी, दूध व मासांहार दिला जातो. त्याचे अनुकरण पनवेल पालिका करत नाही. नवी मुंबई महापालिकेने १४ काळजी केंद्र असून तेथील रुग्णांना दर्जेदार व सकस आहार दिला जात आहे. तसेच बुधवारी व रविवारी मांसाहार थाळी दिली जाते तर पनवेलमध्ये का दिली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

करोना रुग्णांना सर्वाधिक त्रास श्वसनाचा होता. त्याचा भार अन्नपचनावर पडतो. त्यामुळे मटन व चिकन हे देणे योग्य होणार नाही. मात्र दूध, अंडी व फळे ही करोना रुग्णांना दिलीच पाहिजेत. टास्क फोर्सच्या बैठकीत या विषयावर यापूर्वी चर्चा झाली असती तर आहारातील हा बदल सुचवता आला असता.

डॉ. गिरीश गुणे, सदस्य, टास्क फोर्स, पनवेल पालिका