रस्त्यांवर केवळ अडथळे, पोलीस बेपत्ता; जरब नसल्याने नागरिक मोकाट

नवी मुंबई : राज्यभर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी पहिल्याच दिवशी, गुरुवारी प्रभावहीन ठरली. करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या या निर्बंधांची अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी पोलीस कर्मचारीच रस्त्यावर नसल्याचे अनेक ठिकाणी आढळून आले. पोलिसांची जरब नसल्याने नागरिकही अत्यावश्यक वस्तूखरेदी किंवा कामांच्या नावाखाली बाजार, रस्ते येथे मोकाट संचार करताना दिसत होते.

बुधवारपासून राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे नवी मुंबईत दिवसभर शुकशुकाट असेल अशी अपेक्षा केली जात होती, मात्र ती फोल ठरली. सकाळी अकरापर्यंत अनेक ठिकाणी दुकाने व सर्व व्यवहार कडकडीत बंद असल्याचे व रस्त्यावर तुरळक वर्दळ पाहायला मिळाली. मात्र पोलीस बंदोबस्त फारच कमी ठिकाणी पाहायला मिळाला. शहरातील महत्त्वाचे चौक, रस्ते तसेच वर्दळीची ठिकाणे येथे पोलीस तैनात नव्हते. पोलीस कर्मचारी न दिसल्याने सकाळी अकरानंतर नागरिकही मोकाटपणे रस्त्यावर उतरले. यात अतिउत्साही तरुण दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त होते. तीन टाकी कोपरखैरणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी, एपीएमसी मार्केट येथील चौकात सकाळपासून बंद असलेली सिग्नल यंत्रणा दुपारनंतर वाहतूक वाढल्याने सुरू करण्यात आली होती. एनएमएमटी आणि बेस्ट या शहर वाहतूक बसमध्ये मात्र गर्दी नव्हती. लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना परवानगी असली तरीही सर्वच प्रकारचे प्रवासी प्रवास करताना दिसून येत होते. लोकलचे तिकीट काढतानाही कुठलीही विचारपूस न करता तिकीट दिले जात होते. रेल्वे स्थानक वा फलाटावर टाळेबंदीत असतो तसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे निर्धास्तपणे प्रवासी ये-जा करीत होते.

पनवलेमध्ये उत्स्फूर्त बंद

पनवेल : पालेभाजी, किराणा माल, फळविक्रेता व मिठाईची दुकाने वगळता पनवेलमधील इतर दुकानदारांनी स्वत:हून पंधरा दिवसांच्या संचारबंदीला उत्स्फूर्त पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली. औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र सुरू असल्याने पोलिसांना यावेळी मोठ्या प्रमाणात वसाहतींची प्रवेशद्वारे बंद करण्याची वेळ आली नाही.

पनवेल शहरासह खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, करंजाडे व तळोजा, नावडे या वसाहतींमधील अनेक प्रवेशद्वारांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, घराबाहेर कोणत्या कामासाठी बाहेर पडलात, तसेच विनामुखपट्टी याची चौकशी ते करताना दिसले. औद्योगिक वसाहतीला मुभा असल्याने तीनही पाळ्यांमध्ये कंपन्यांचे काम सुरू होते. शुक्रवारी पोलिसांचा कडक  राहणार आहे.

दुकाने अर्धवट खुली

टाळेबंदीत केवळ अत्यावश्यक सेवेतील सेवा सुरू राहणार आहेत. यात दुग्धालय, किराणा, भाजी, औषधांच्या दुकानांचा समावेश होतो. असे असले तरी चप्पल, कपडे , जनरल स्टोअर बंद करून त्याचे मालक वा कर्मचारी बाहेरच उभे राहतात. परिचित ग्राहक आल्यावर शटर उघडून त्याला आत घेऊन मालाची विक्री काही ठिकाणी सुरू आहे.

अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त सर्व बंद आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून स्वत:वरील कारवाई टाळावी. कदाचित तुम्ही पोलीस कारवाईतून पळवाट शोधू शकता; मात्र करोनापासून नाही. – सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त