नवी मुंबईतील गावांच्या सीमा बंद; दाटीवाटीचा परिसर असल्याने करोना संसर्गाची मोठी भीती

नवी मुंबई : शहरी भागात आढळणाऱ्या करोना रुग्णांचे लोण आता नवी मुंबईतील ग्रामीण भागाकडेही वळू लागल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तुर्भे, बेलापूर, दिवा, कोपरी या गावात  रुग्ण आढळ्याने गावांच्या चर्तुसीमा बंद करण्याचे काम ग्रामस्थांनी सुरू केले आहे. ‘गाव बंद’ची ही हाक संपूर्ण पंचक्रोशीत देण्यात आली आहे. बेकायदेशीर बांधकामांमुळे नवी मुंबईतील ग्रामीण भागात अस्ताव्यस्त विकास होऊन रहिवाशांची मोठय़ा प्रमाणात दाटीवाटी निर्माण झाली आहे. त्यामुळे गावात होणारी करोना साथीची लागण भीती निर्माण करणारी आहे.

नवी मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नवी मुंबई लवकरच हजाराचा टप्पा गाठणार असे चित्र झाले आहे. नवी मुंबई सात उपनगरे, २९ गावे आणि ४७ झोपडय़ांनी बनलेले शहर आहे. गेली दोन महिने आढळणारे करोना रुग्ण हे शहरी भागापुरते मर्यादित होते. ह्य़ा साथीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ग्रामस्थांनी बैठका घेऊन काही गावांच्या सीमा बंद केल्या होत्या, मात्र मजूर, कामगार यांना गावी सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर गावातील ही ये-जा सुरू झाली आहे. प्रत्येक गावात रोजंदारी करणारे कामगार आणि मजूर हे या बेकायदेशीर घरांमधील रहिवासी आहेत. नव्वदनंतर नवी मुंबईतील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने गावांच्या जवळील सिडको संपादित मोकळ्या जमिनीवर प्रकल्पग्रस्त तसेच काही भूमाफियांनी मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. या घरांमध्ये आजच्या घडीला चार लाखांपेक्षा जास्त रहिवासी राहत असून ही संपूर्ण वसाहत दाटीवटीची असल्याने सामाजिक अंतर पाळणे शक्य नाही. मुंबईतील धारावी झोपडपट्टीची सुधारित आवृत्ती म्हणून या गावातील वसाहतींकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या गावात करोना रुग्ण आढळून आल्यास साथीचा प्रादुर्भाव कैक पटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेले अनेक दिवस करोनाच्या साथीला गावा बाहेर ठेवण्यास यशस्वी ठरलेल्या ग्रामस्थांच्या तुर्भे गावात करोना रुग्ण आढळून आला असून ग्रामस्थांनी चतु:सीमा बंद करण्यास सुरुवात केली आहे. तुर्भे गावात एक करोना रुग्ण आढळून आल्याने शिरवणे येथील ग्रामस्थांनी पोलिसांच्या साह्य़ाने गावाच्या सीमा बंद केल्या आहेत.