९६ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांवर घसरण

नवी मुंबई : करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने नवी मुंबईतील करोनामुक्तीचा दर हा ९६ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांवर घसरला आहे. तसेच गेल्या १४ दिवसांत दररोज करोनाबाधित होणाऱ्यांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही कमी आहे. एप्रिल महिन्यात नव्या रुग्णांची संख्या १४,२८५ वाढली, तर करोनामुक्त झालेल्यांची संख्या फक्त ८९४८ आहे.

फेब्रुवारीच्या अखेरपासून रुग्णसंख्या वाढू लागली असतानाही फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांत ९४ टक्क्यांच्या आसपास करोनामुक्तीचे प्रमाण होते. परंतु, एप्रिलमध्ये या प्रमाणात लक्षणीय घसरण झाली आहे.  एप्रिल महिन्यात सातत्याने नवे रुग्ण १ हजाराच्यावर येत आहेत. ४  एप्रिल रोजी आजवरची सर्वाधिक १४४१ इतकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना करोनातून बरे होणाऱ्यांचा वेग मात्र मंदावला आहे.  करोनामुळे मृत झालेल्यांमध्ये  ५० वयोगटावरील  रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची आवश्यकता जास्त आहे. तर नवे करोनाग्रस्त हे २० ते ४० वयोगटातील अधिक आहेत.

‘पालिकेकडून योग्य उपचार राबवण्यात येत आहेत. मात्र, करोना विषाणूचा प्रकार बदलला असल्यामुळे रुग्णांना बरे होण्यास विलंब लागत आहे. असे असले तरी गेल्या दोन दिवसांपासून करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तरीही नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे,’ असे मत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केले.