नवी मुंबईतील करोना स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांचा दावा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या शहरांत करोनाचा प्रादुर्भाव अधिक जाणवत असला तरी राज्य सरकार आणि महापालिका यांच्या प्रयत्नांतून येत्या २० ते २५ दिवसांत या दोन्ही शहरांतील रुग्णसंख्या नियंत्रणात येईल, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यात केला. ‘इतर शहरांमधील प्रशासकीय यंत्रणांना करोना नियंत्रण जमतंय आणि नवी मुंबईत ते जमत नाही, असा याचा अर्थ काढू नका’ असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाची पाठराखणही केली.

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या शहरांमधील करोना नियंत्रण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिका मुख्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री एकनाथ िशदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास ही मंडळी उपस्थित होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली शहरातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. एखाद्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या परिसरात किमान १५ दिवस तरी या साथीचा प्रभाव राहतो असा अनुभव आहे. याच काळात ही साथ वेगवेगळ्या पद्धतीने लक्षणे दाखवत राहतो. नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या शहरांचा असा काळ सुरू असून येत्या २० ते २५ दिवसांत रुग्णांचा आलेख कमी होऊ शकेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

चाचण्या वाढवण्याच्या सूचना

बैठकीत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील करोना नियंत्रण मोहिमेची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. करोनाची बाधा रोखण्यासाठी मागील चाळीस दिवस नियोजित प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. तरी प्रतिजन चाचण्या वाढविण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. या मुद्दय़ावर बोलताना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी प्रतिजन चाचण्यांसोबत नियमित चाचण्याही वाढविणे गरजेचे आहे अशा सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांनीही या वेळी नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसारख्या शहरात ‘आरटीपीसीआर’ चाचण्या आणखी वाढविण्याची गरज व्यक्त करताना अधिक मोठय़ा प्रमाणावर आरोग्य सुविधा, रुग्णालये उभारण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. नवी मुंबईतील खासगी कोविड रुग्णालयात रुग्णांना मोठय़ा प्रमाणावर बिलांची आकारणी केली जात असल्याच्या तक्रारींचा मुद्दाही या बैठकीत चर्चिला गेला.