उपचाराधीन रुग्ण १२४७; पाच काळजी केंदातील प्रवेश बंद

नवी मुंबई</strong> : नवी मुंबईत करोना परिस्थिती नियंत्रणात येत असून सोमवारी फक्त १३०० रुग्ण उपचार घेत होते. तर दररोज सापडणाऱ्या बाधितांची संख्याही कमी झाली असून ती शंभरच्या आत आली आहे. त्यामुळे तीन करोना काळजी केंद्रे बंद करण्यात आली असून पाच ठिकाणी नवीन प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे.

करोना संसर्ग वाढल्यानंतर १६ जूनपर्यंतच दररोजच्या बाधितांची संख्या ही दोन अंकी होती. त्यानंतर यात वाढ होत दररोज तीनशे ते चारशेच्या घरात पोहचली होती. त्यानंतर आता पहिल्यांदा बाधितांची संख्या दोन अंकी झाली आहे, हे नवी मुंबईकरांसाठी दिलासा देणारे चित्र आहे. असे असले तरी दिल्लीमध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने पालिका प्रशासन सतर्क आहे.

मागील नऊ महिन्यांपासून सुरू असलेला करोनाचा कहर कमी होत आहे. महिनाभरात नव्या करोना रुग्णांबरोबरच उपचाराधिन रुग्णांची संख्याही घटली आहे. पालिकेच्या वाशी सेक्टर १४, वारकरी भवन बेलापूर तसेच इंडिया बुल्स काळजी केंद्रात एकही करोना रुग्ण नाही. इंडिया बुल्स येथील प्रवेश आधीच बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता शहरातील इतर दोन केंद्रांतही एकही रुग्ण नसल्याने ही केंद्रे तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. शहरात सिडको येथील प्रदर्शनी केंद्र, राधास्वामी सत्संग भवन, निर्यात भवन व डॉ.डी.वाय पाटील रुग्णालय या चार ठिकाणीच करोना उपचार सध्या सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

रुग्णसंख्या कमी होत असली तरी दिवाळीखरेदीसाठी नागरिक बाजापेठेत गर्दी करीत आहेत. गर्दीत करोना नियमांचे पालनही होताना दिसत नाही.

३५६२ उपचाराधिन रुग्ण (९ ऑक्टोबर)

१२४७ उपचाराधिन रुग्ण (१० नोव्हेंबर)

पाच महिन्यानंतर घट

नवी मुंबई शहरात १५ जूनला ९५ तर १६ जूनला ६३ नवे करानाबाधित सापडले होते. त्यानंतर मात्र शहरात सातत्याने बाधितांत वाढ होत गेली. पाच महिन्यांनंतर प्रथमच नव्या रुग्णांची दर दिवसाची संख्या १०० च्या खाली आली आहे.

मंगळवारी ८८ नवे बाधित

नवी मुंबई दररोजच्या करोनाबाधितांत घट होत असून मंगळवारीही हे चित्र कायम राहिले. शहरात ८८ नवे बधितांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या ४५ हजार ६५५ इतकी झाली असून मृतांची संख्या ही ९२८ पर्यंत गेली आहे. मंगळवारी १४३ जन करोनामुक्त होत आतापर्यंत ४३ हजार ४८० जन बरे झाले आहेत  तर १ हजार २४७ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाबाधितांची सद्य:स्थिती

९ नोव्हेबर :     ९१

८ नोव्हेंबर :     ११६

७ नोव्हेंबर :     ७२

६ नोव्हेंबर :     १४५

५ नोव्हेंबर :     ११२

मृतांची कारणमीमांसा करण्याची मागणी

शहरात करोना प्रादुर्भाव सद्य:स्थितीत आटोक्यात आला आहे. पालिकेने मृत्युदर शून्य करण्याचे ठरविले आहे. यासाठी आतापर्यंत करोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची कारणमीमांसा करणे महत्त्वाचे असून त्यासाठी ऑडिट करण्याची मागणी राज्याचे भाजप कामगार आघाडीचे सचिव संजय पवार यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

असे केल्यास कोणत्या आजारामुळे किती मृत्यू झाले हे निष्पन्न होईल. त्यामुळे यापुढे आशा रुग्णांबाबत विशेष दक्षता घेता येईल असे पवार यांचे म्हणणे आहे. नागरिकांसमोर कशामुळे किती मृत्यू झाले हे ठेवल्यास नागरिकही स्वत:ची काळजी घेतील. मुंबई पालिकेने हे ऑडिट सुरू केले असून नवी मुंबई महापालिकेने तसे नियोजन करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या चाचण्या

नवी मुंबई : करोना रुग्ण संख्या उतरणीलालागली असली तरी दररोज तीन हजार करोना चाचण्यांचे लक्ष पालिका प्रशासनाने ठेवले आहे. आतापर्यंत तीन लाख नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. हा आकडा लोकसंख्येच्या तुलनेत २० टक्के इतका आहे.

आगामी काळात जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करून करोना संसर्गाची साखळी तोडण्याचे लक्ष पालिकेने ठेवले आहे. बाजाबाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी चिंतेचा विषय आहे.

आतापर्यंत  १ लाख ९५ हजार १७१ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या असून १ लाख ०६ हजार ७२९ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. चाचण्या झालेल्या नागरिकांची संख्या ही ३ लाख १ हजार ९०० इतकी झाली आहे.

नवी मुंबई शहरातील करोनाची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. परंतू नागरिकांनीही बिनधास्त वावरणे सुरू केले आहे, हे चिंताजनक आहे. दिल्लीत रुग्संख्या वाढते आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका