पनवेल ग्रामीण भागात संचांची कमतरता; शहरात चाचण्यांना नकार

पनवेल : एकीकडे करोना संसर्गाची साखळी मोडून काढण्यासाठी निदान चाचण्यांवर भर देण्याच्या सूचना केल्या असताना, पनवेलच्या ग्रामीण भागात मात्र, चाचणी संचांअभावी करोनाबाधितांचा शोध घेणे कठीण बनले आहे. ग्रामीण भागातील बहुतांश आरोग्य केंद्रांवर प्रतिजन चाचण्यांचे संच नसल्याची परिस्थिती आहे. तर चाचणीसाठी पनवेल पालिका हद्दीतील आरोग्य केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यास आरोग्य अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात येत आहे. त्यामुळे नाइलाजाने नागरिकांना खासगी प्रयोगशाळेत जाऊन करोना चाचणीसाठी पैसे मोजावे लागत आहेत.

ग्रामीण भागात आतापर्यंत १२ हजार करोनाग्रस्त आढळले असून सध्याही दीड हजारांहून अधिक नागरिक विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत १५३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.  असे असताना चाचणी किट ग्रामीण पनवेलमध्ये उपलब्ध नसल्याने होत नाही. गव्हाण, वावंजे, नेरे, आजिवली, आपटा, उलवे येथील आरोग्य केंद्रामध्ये करोना चाचणी करण्याचे प्रमाण प्रभावीपणे राबविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात आठ मोबाइल व्हॅनमधील वैद्यकीय पथक आणि सहा आरोग्य केंद्रामध्ये दिवसाला दोन हजारांहून अधिक करोना चाचण्या नागरिकांच्या केल्या जातात. त्यामध्ये नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य नसल्यास पालिकेने घरापर्यंत चाचणी करण्याची सोय केली आहे. मात्र ग्रामीण पनवेलमध्ये चित्र उलटे आहे. सुकापूर, वावंजे, चिंध्रण, नेरे, आकुर्ली, करंजाडे या गावांच्या हद्दीत राहणाऱ्या वसाहतींमधील नागरिकांना करोना चाचणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

वावंजे व आजिवली या केंद्राकडे आजही प्रत्येकी १३ प्रतिजन चाचणी संच उपलब्ध आहेत. उर्वरित आरोग्य केंद्रांच्या मागणीनंतर जिल्ह्याकडून करोना चाचणीचे संच आल्यास त्या केंद्रांना पोहचविल्या जातील. मागणीनुसार चाचणी संच दिले जात आहेत. -डॉ. सुनील नखाते, वैद्यकीय अधिकारी, पनवेल तालुका