नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असताना महापालिकेच्या मुख्यालयातही करोनाने शिरकाव केला आहे. इथल्या विविध विभागातील सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर तातडीने मुख्यालयातील कामकाज थांबवून निर्जंतुकीकरण करणे अपेक्षित असताना शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मुख्यालय इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याबाबत माहिती दिली.

नवी मुंबई शहरात करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून बुधवारपर्यंत करोना रुग्णांची संख्या ६,८२३ झाली आहे. त्यातच आता नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातही करोनाचा शिरकाव झाला असून ७ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालिका मुख्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. सुरुवातीला गुरुवार, शुक्रवार पालिका बंद राहणार असल्याची चर्चा होती. परंतू आता येथे शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी निर्जंतुकीरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

शहरात बुधवारी २१८ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ६,८२३ झाली आहे. शहरात आज ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या २१७ झाली आहे. शहरात करोनामुक्त होण्याचा दर चांगला असून शहरात आतापर्यंत ६,८२३ रुग्णांपैकी तब्बल ३,८३४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर १,४८६ करोना तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आता पालिका मुख्यालयातही करोनाने शिरकाव केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.