नवी मुंबई : शनिवारपासून ३० वर्षांवरील सर्वाना लस देण्यात येणार असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लसीकरण केंद्रांत वाढ करण्याचे ठरविले असून शहरात पुढील आठवडाभरात  पालिकेच्या १११ केंद्रांवर लस दिली जाणार आहे. नवी मुंबईकरांना घरोघरी लसीकरण शक्य नाही, मात्र घराजवळ लसीकरण सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

त्यात संचारबंदी उठविल्यानंतर शहरातील गर्दी वाढली असून ५० पर्यंत स्थिर असलेली करोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

१६ जानेवारीपासून शहरात लसीकरण सुरू झाले आहे. आतापर्यंत चार लाखांपेक्षा अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. या महिन्यात खासगी रुग्णालयांना लस उपलब्ध होत असल्याने त्यांच्यामार्फत मोठय़ा प्रमाणात लसीकरण सुरू असून दिवसाला सरासरी दहा हजार जणांचे लसीकरण होत आहे. मात्र पालिकेने दिवसाला १५ हजार जणांच्या लसीकरणाची तयारी ठेवली आहे.

केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वाचे लसीकरण सुरू करण्याचे ठरविले असून यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे  या वयोगटोतल्या कोणालाही थेट लसीकरण केंद्रावर जाऊन तिथे नोंदणीनंतर लस घेता येणार आहे.  तसेच राज्य सरकारने शनिवारपासून ३० वर्षांवरील सर्वाना लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत सुरुवातीला ३० केंद्रांवर लसीकरण होत होते. त्यानंतर या केंद्रांत वाढ करीत ५४ केंद्रे करण्यात आली होती. त्यामळे ८४ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. आता घराजवळ लस उपलब्ध करण्याचे नियोजन केल्याने २७ केंद्रे वाढविण्यात येणार असून आता १११ केंद्रांवर करण्यात येणार आहे. दिवसाला १५ हजार नागरिकांचे लसीकरणाचे लक्ष ठेवले आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना मोठी झळ बसली होती तर दुसऱ्या लाटेत तरुणांची बाधित होण्याची संख्या आहे. आता तिसऱ्या

लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून यात लहान मुलांना धोका व्यक्त होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेपूर्वी पालिकेने शहरातील जवळजवळ ४.५० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे ठरविले आहे. लसीकरण वाढवण्यासाठी आशा सेविकांचीही मदत घेतली जात आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार लसीकरण नियोजन केले असल्याची माहिती पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली.

शहरात व्यापक लसीकरण करण्यासाठी पालिकेचे १०४ लसीकरण केंद्राचे नियोजन असून घराजवळ लसीकरण केंद्र हे लक्ष्य आहे. त्यामुळे पालिका शाळांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली असून लस पुरवठय़ानुसार लसीकरण केंद्रांची संख्या १०४ पर्यंत करण्यासाठी पालिका सज्ज आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका