लोकसत्ता : शहरात करोना रुग्ण वाढत असल्याने अतिदक्षता व जीवरक्षक प्रणाली खाटांचा तुटवडा भासू लागल्याने पालिका प्रशासनाने कामोठेतील एमजीएम रुग्णालयाशी करार करीत त्या ठिकाणी १४० खाटा वाढविण्याची तयारी केली आहे. त्यातील २० अतिदक्षता व १० जीवरक्षक प्रणाली खाटांची सेवा सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी आणखी २० अतिदक्षता खाटा सुरू करण्यात येणार आहेत.

सध्या नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत २०० अतिदक्षता खाटा आणि ८० जीवरक्षक प्रणाली उपलब्ध करून दिलेली आहे. आता कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नियोजित १०० अतिदक्षता खाटा आणि  ४० जीवरक्षक प्रणाली वाढवण्यात येत आहेत. पुढील काही दिवसात सिडको प्रदर्शनी केंद्रात आणखी ७५ अतिदक्षता खाटांची सुविधाही वाढवण्यात येणार आहे. निविदेसाठी पालिकेने मुंबई, पुणे येथे जम्बो करोना केंद्र चालवणाऱ्या ठेकेदारांनाही संपर्क  करून निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याची विनंती केली असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.