काम अत्यावश्यक सेवा अनावश्यक?
नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजार समितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत असल्याने टाळेबंदीतही येथील काम सुरू ठेवण्यात येते. त्यामुळे व्यापारी, माथाडी कामगार व सुरक्षा रक्षकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा ही मागणी गेल्या वर्षभरापासून करण्यात येत आहे. मात्र अद्याप तसा निर्णय न झाल्याने या बाजार घटकांची परवड सुरूच आहे.
एपीएमसी कर्मचारी वगळता या बाजार घटकांना सुरक्षा विमा कवच नाही, लसीकरणातही प्राधान्य नाही त्यामुळे करोना संकटातही त्यांना दिवसरात्र काम करावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अत्यावश्यक सेवेत काम करून तो दर्जा मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
एपीएमसीच्या या पाचही बाजारपेठांमधून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला महिला कामगार करोनाकाळात जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. हे ठिकाण गर्दीचे असल्याने या ठिकाणी करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. गेल्या वर्षी एपीएमसी परिसर करोना हॉटस्पॉट ठरला होता. आताही या ठिकाणी करोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. करोनामुळे येथील व्यापारी, सुरक्षारक्षक व २५ ते ३० माथाडी कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे माथाडी कामगार संघटनेने बाजार घटकांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे अशी मागणी केली आहे. यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. मात्र शहरावर करोनाची दुसरी लाट आली तरी या घटकांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करण्यात न आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बाजार आवारातच त्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सुविधा व उपचार मिळावेत अशी मागणी आहे.
शासनाने एपीएमसीचा जीवनावश्यक वस्तूंमुळे अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे, मात्र या ठिकाणी काम करणाऱ्या घटकांना मात्र आद्याप वाऱ्यावर सोडले आहे. ना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले गेले ना सुरक्षा विमा कवच देण्यात आले. लसीकरणातही त्यांना प्राधान्य देण्यात आले नाही. सरकारला या बाजार घटकांचे काही एक पडलेले नाही. – नरेंद्र पाटील, माथाडी नेते
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 9, 2021 12:02 am