नवी मुंबईत ८० टक्के मृत्यू ५० वर्षांवरील रुग्णांचे

नवी मुंबई : नवी मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्याही साधारण नऊशे ते ११०० या दरम्यान स्थिर राहात असली तरी, दररोज मृत्युमुखी पडणाऱ्या करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या दिवसाला आठ ते नऊ जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. आतापर्यंत करोनामुळे १२६८ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १०२३ बळी ५० वर्षांवरील व्यक्तींचे आहेत.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्युमुळे ज्येष्ठ नागरिकांची चिंता वाढली असता अचनाक ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन तरुणाईलाही करोनाचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्याचे आव्हान पालिकेपुढे नव्याने उभे राहिले आहे. शहरात गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून करोना मृत्यूची संख्या सातत्याने घटत होती. परंतु मार्चमध्ये एप्रिलमध्ये ही संख्या मात्र वाढत असल्याची स्थिती आहे. जानेवारी महिन्यात २१, फेब्रुवारीमध्ये ३४ असलेली मृत्यूची संख्या मार्चमध्ये तब्बल ५५ पर्यंत गेली आहे, तर एप्रिल महिन्यामध्ये सरासरी दिवसाला ८ ते ९ मृत्यू होत आहेत.

‘५० वर्षांवरील व सहव्याधी व्यक्तीला घरीच अलगीकरणात ठेऊ  नका. त्यामुळे अशा रुग्णांना अधिक धोका आहे. इतर आजार असलेल्यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी व लहान मुलांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे,’ असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.