नवी मुंबई : राज्य शासनाने लागू केलेल्या रात्रीच्या जमावबंदीमुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेली करोना रुग्णांची संख्या गुरुवारी अचानक ९७१ पर्यंत गेल्याने पालिका प्रशासन हादरले आहे. रात्री उशिरापर्यंत सर्व विभागांचे अधिकारी तसेच प्रभाग अधिकारी या वाढत्या रुग्णसंख्येला रोखावे कसे, याचे विचारमंथन करीत होते. यात आठवडी बाजार बंद करणे व प्रतिबंधित क्षेत्रांचे नव्याने व्यवस्थापन करताना त्या क्षेत्रातील मुक्तसंचार करणाऱ्या करोनाबाधित रुग्णांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

पंधरा, सोळा लाख लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी-जास्त होत आहे. रविवारपासून सहाशे रुग्णांच्या आवाक्यात असलेली ही संख्या गुरुवारी अचानक ९७१ पर्यंत गेली आहे. त्यामुळे प्रशासन चांगलेच हादरले असून विविध उपाययोजना करण्यासाठी तातडीच्या बैठका सुरू आहेत. कोपरखैरणे सेक्टर नऊमध्ये एकाच दिवशी ७४ रुग्ण सापडल्याने त्या ठिकाणच्या सर्व संपर्कातील नागरिकांची चाचणी शुक्रवारी केली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरिक मुक्तसंचार करीत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाईदेखील करावी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेता येणार नसल्याने कडक निर्बंध लावले जाणार आहेत. रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत असलेल्या जमावबंदीचे उल्लंघन काही हॉटेल-रेस्टॉरन्ट मालक करत आहेत. त्यांना दंड आकारण्यात येत असून त्यांचे हॉटेल सील करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. गुपचूप पद्धतीने हे रेस्टॉरन्ट सुरू असल्याचे काही ठिकाणी आढळून आले आहे. गर्दी असणाऱ्या मॉल्सना प्रतिजन चाचणी बंधनकारक करण्यात आली असून तिची अंमलबजावणी शुक्रवारपासून सक्त केली जाणार आहे. गर्दीचे प्रमुख ठिकाण असलेले हे मॉल्स बंद करण्याचा शासन विचार करण्याची शक्यता आहे. मात्र पालिका येथील प्रवेश निर्बंध कडक करणार आहे. आठवडी बाजार हे हा विषाणू पसरवण्यास जास्त परिणामकारक ठरत असल्याने त्यांना तूर्त बंद करण्याचा प्रशासन प्रस्ताव तयार करीत आहे.

गेल्या वर्षी १० ऑगस्ट रोजी ४७७ सर्वाधिक रुग्ण सापडले होते. त्यानंतर ही संख्या कमी झाली होती. त्यामुळे शहराला दिलासा मिळाला होता. मात्र आता दररोज नवे उच्चांक करोना गाठत आहे. गुरुवारी ९७१ रुग्ण सापडले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ६७०० वर गेली आहे, तर करोनाबाधितांची संख्या ६४,४८० इतकी झाली आहे. गुरुवारी ४०३ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ५८,६०१ जण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधीन रुग्ण ६७०० इतके आहेत. तर मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ११७९ इतकी झाली आहे.