दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट;  नवी मुंबईत महिनाभरात २६,९३० बाधित

ठाणे/ नवी मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यभर उसळी घेत असलेली करोनाची दुसरी लाट ठाणे जिल्ह्याात ओसरू लागली आहे. ठाणे जिल्ह्यात दररोज आढळून येणाऱ्या नव्या करोनाबाधितांची संख्या निम्म्याने घटून तीन हजारांवर आली असून जिल्ह्याातील सर्व शहरांत विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. ठाणे, नवी मुंबई या शहरांमध्ये लागणदर (पॉझिटिव्हिटी रेट) दहा ते १३ टक्क्यांपर्यंत घसरल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट होऊ लागल्यामुळे रुग्णालयांत रिक्त खाटा लवकर उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांत करोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागला होता. त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होऊ लागली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याातील दैनंदिन रुग्णसंख्या पाच ते सहा हजारांवर गेली होती. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या शहरांतील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता तर, अन्यत्रही रोज उच्चांकी रुग्ण आढळून येत होते. मात्र, गेल्या आठवडाभरात हे चित्र बदलू लागले आहे.

नवी मुंबईत करोना रुग्णांची आतापर्यंत सर्वोच्च रुग्णवाढ ५ एप्रिल रोजी होत ती १४४१ इतकी होती. त्यानंतर सातत्याने दैनंदिन रुग्ण १ हजारांच्या घरात सापडत राहिले. कडक संचारबंदीनंतर १७ एप्रिलनंतर रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत ती एक हजारांपेक्षा कमी होत गेली. त्यामुळे प्रशासनावर आलेला प्रचंड ताण काही प्रमणात हलका झाला आहे. असे असले तरी खाटा व प्राणवायू तुटवड्याची परवड सुरूच आहे. नवी मुंबईच्या तुलनेत शेजारील ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये दररोजचे नवे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नवी मुंबईत दिवसाला ५००च्या जवळपास नवे रुग्ण सापडत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. शहरात दररोज पाच ते सहा हजार चाचण्या करण्यात येत असून त्यामध्ये ७०० ते ८०० रुग्ण आढळून येत आहेत. सद्यस्थितीत महापालिका हद्दीत ८७७७ सक्रिय रुग्ण आहेत. २० दिवसांपूर्वी शहरात १६ हजारांच्या आसपास सक्रिय रुग्ण होते. ही संख्या निम्म्यावर आली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क््यावरून ९१.३१ टक्क््यांवर आले आहे. ८७७७ सक्रिय रुग्णापैकी लक्षणे नसलेले ५९५० रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. महापालिका आणि खासगी करोना       रुग्णालयांमध्ये एकूण ५ हजार २९१ खाटा उपलब्ध होत्या. त्यापैकी २४७५ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत उर्वरित २८१६ (५३ टक्के) खाटा  शिल्लक आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागात ३९ टक्के, प्राणवायू असलेल्या ५४ टक्के, कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या ४४ टक्के खाटा शिल्लक आहेत. काही दिवसांपूर्वी रुग्णवाढीमुळे रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्याचे चित्र होते. रुग्ण संख्या कमी झाल्याने खाटा रिकाम्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या महिन्यात दोन ते अडीच हजार करोना रुग्ण आढळून येत होते. येथेही आता ७०० ते ८०० रुग्ण आढळत आहेत. दोन महिन्यांपूर्वी रुग्ण संख्या वाढू लागल्यामुळे प्रशासनाने दररोज २२०० पर्यंत होणाऱ्या करोना चाचण्यांची संख्या ३३०० पर्यंत वाढविली होती. लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने चाचण्यांची संख्याही कमी होत आहे, असा दावा महापालिकेमार्फत केला जात आहे. कल्याण डोंबिवलीत ६७३१ खाटा असून त्या ठिकाणी ६२०० रुग्ण उपचार घेत आहेत. विलगीकरणात ३३५५ खाटा आहेत.

या खाटांवर ३३५० रुग्ण उपचार घेत आहेत. प्राणवायूच्या २४७७ खाटा असून त्यावर दोन हजार ६५ रुग्ण, अतिदक्षता विभागाच्या १००४ खाटा असून त्यावर ७६५ रुग्ण, जीवरक्षक यंत्रणेच्या २१८ खाटा असून त्यावर ६५ रुग्ण उपचार घेत आहेत.

५१ दिवसांत पनवेलमध्ये २४७ करोना मृत्यू

पनवेल : पनवेल : गेल्या ५१ दिवसांत पनवेल पालिका क्षेत्रातील २१,०३८ जण करोनाबाधित झाले असून २४७  जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी करोनामुक्तीचा दर ९५.१९ टक्के होता तो घसरला असून ९० टक्केपर्यंत खाली आला आहे. पनवेल शहरात ५१ दिवसांपूर्वी घरोघरी व रुग्णालयांमध्ये ६५२ रुग्ण उपचार घेत होते, तर सध्या पनवेलमध्ये चार हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

मागील काही दिवसांपासून नवे रुग्णसंख्या ५०० च्या जवळपास  येत आहेत. त्यामुळे शहरातील करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही कमी झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. तरीही शहरात प्राणवायूची मागणी सतत वाढत आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका