शहर धोक्याच्या पातळीवर

नवी मुंबई : शहरात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या सातशेपर्यंत गेली असून फेब्रुवारीमध्ये ३ टक्क्यांपर्यंत खाली आलेला रुग्णवाढीचा दर महिनाभरात १५ टक्क्यांवर गेला आहे. आगदी काही दिवसांत ही १२ टक्क्यांची वाढ झाली असून शहरासाठी ही धोक्याची घंटा आहे. रुग्णांची संपर्क साखळी तोडली नाही तर दैनदिन रुग्ण एक हजारापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी ३ मार्च २०२० रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वर्षभरात रुग्ण्संख्या ६५ हजारांपेक्षा अधिक झाली असून ११७१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी २० ऑगस्ट रोजी दैनंदिन रुग्णसंख्या ४७७ होती ती आता ७०० पेक्षा अधिक झाली आहे.

१५ फेब्रुवारीपासून शहरात पुन्हा करोनाची रुग्णवाढ सुरू झाली आहे. दीड महिन्यात या वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आतापर्यंतच्या करोनाकाळातील सर्व उच्चांक मोडले आहेत. नवे रुग्ण, उपचाराधीन रुग्ण, रुग्णवाढीचा दर अशा सर्वच पातळीवर करोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात करोनासाठी उपलब्ध खाटांची संख्याही आता कमी पडू लागली आहेत. खासगी रुग्णालये तर करोना रुग्णांनी व्यापली आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनावरचा ताण वाढला आहे. बंद केलेली सर्व आरोग्य व्यवस्था खुली करण्यास सुरुवा्रत केली आहे. फेब्रुवारी महिन्यात शहरात रुग्णवाढीचा दर ३ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत गेला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या १ हजार पार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. दिवसाला तीन हजारांपर्यंत असलेल्या करोना चाचण्यांत दुपटीने वाढ करीत त्या  ६ हजारापर्यंत आता होत आहेत. यात लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने रुग्णवाढीचा धोका अधिक वाढला आहे.

शहरात रुग्णसंख्या कमी झाली होती, तेव्हा रुग्णवाढीचा दर ३ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. तो आता १५ टक्क्यांपर्यंत गेला आहे. पण करोना चाचण्यांचे प्रमाणही दिवसाला साधारणत: ६ हजारांपर्यंत वाढवले आहे. शहरासाठी ही बाब चिंतेची नक्कीच आहे. मात्र यात आणगी वाढ झाली तर हा शहरासाठी धोक्याचे ठरणार आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका