दोन दिवसांत ३० ते ४४ वयोगटातील आठ हजार जणांना लस

नवी मुंबई : करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली असून या मोहिमेत नवा उत्साह निर्माण झाला आहे.  दोन दिवसांत आठ हजारांपेक्षा अधिक जणांना पहिली मात्रा देण्यात आली आहे. तर मंगळवारपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. पाच केंद्रांवर नियोजन केले आहे.

केंद्र सरकारने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मुभा राज्यांना दिल्यानंतर राज्य शासनाने शनिवारपासून या वयोगटासाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार शनिवारपासून शहरात या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी ६०५८ नागरिकांनी करोना लशीची पहिली मात्रा घेतली.

३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी २३ नागरी आरोग्य केंद्रे, ४ रुग्णालये, ईएसआयएस रुग्णालयातील जम्बो सेंटर तसेच २ मॉलमधील ड्राइव्ह इन लसीकरण अशा ३० ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. दोन दिवसात ८००८ नागरिकांनी लस घेतली आहे.

महापालिकेकडे सोमवारी १२ हजार लसकुप्या प्राप्त झाल्या असून १५ हजारांपेक्षा अधिक लस कुपया शिल्लक असल्याची माहिती पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्र्रभा चव्हाण यांनी दिली.

परदेशी जाणाऱ्यांसाठी दुसरी मात्रा

महानगरपालिकेच्या वतीने परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तीन विशेष लसीकरण सत्रे राबविण्यात आली आहेत. याशिवाय परदेशात शिक्षण, नोकरी तसेच

टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जाण्याकरिता कोव्हिशील्ड लसीचा दुसरी मात्राही दिली जाणार आहे. पहिला मात्रा घेऊन २८ दिवस झालेल्यांना दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर आरोग्य विभागामध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून संबंधितांनी दुपारी २ ते ६ या वेळेत या ठिकाणी कागदपत्रे दाखवून लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी परवानगी घेता येणार आहे.