|| पूनम सकपाळ

आरोग्य व आपत्कालीन खर्चात १८६ कोटींची वाढ; करवसुलीही १०० कोटींनी कमी

नवी मुंबई : करोना संकटामुळे या वर्षी पालिकेची तिजोरी रिकामी झाली असून उत्पन्नाचा मोठा आधार असलेल्या विविध करांची वसुलीही शंभर कोटींनी घटली आहे. त्यामुळे पालिकेचा ताळेबंद बिघडला आहे. गेल्या वर्षी पालिकेच्या सर्वच विभागांतील खर्चात वाढ झाली आहे. मात्र आरोग्य व आपत्कालीन व्यवस्थेवर या वर्षी २२१ कोटी खर्च झाला आहे. यात २०१९ या वर्षीच्या तुलनेत १८६ कोटींची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये शहरात करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर हा संसर्ग वाढत गेला. महापालिका आरोग्य विभागावर जास्त खर्च करीत नाही.

२०१९ या वर्षात पालिकेने आरोग्य विभागावर फक्त ३० कोटींचा खर्च केला होता. मात्र मार्चनंतर सुरू झालेल्या करोना संकटामुळे डिसेंबरपर्यंत या विभागावर पालिकेचे १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तसेच करोना ही आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे पालिकेने आपत्कालीन व्यवस्थेसाठी १२१ कोटींचा खर्च केला आहे. तो २०१९ मध्ये फक्त ५ कोटी इतका होता. त्यामुळे या दोन विभागांवरच पालिकेने २०२० मध्ये २२१ कोटींचा खर्च केला आहे. यात १८६ कोटींची वाढ झाली आहे.

दरवर्षी आरोग्य सेवेवर खर्च करण्यासाठी पालिका प्रशासन आखडता हात घेत असते. मात्र करोनानंतर आरोग्याचे महत्त्व सर्वांनाच पटल्याने पालिकेने आधुनिक सोयी-सुविधांसह औषधोपचाराकडे अधिक लक्ष दिले. नेरुळ येथे प्रयोगशाळा उभारली. अतिदक्षता सेवेसह कृत्रिम श्वसन यंत्रणा उभारली. तर १३ करोना काळजी केंद्रांसह पालिकेच्या वाशी रुग्णालय करोनासाठी राखीव ठेवले. वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात सुमारे १२०० खाटांचे रुग्णालयच उभारले आहे.

पालिकेच्या ४ हजार ६०० कोटींच्या अर्थसंकल्पातील डिसेंबर २०२० पर्यंत १ हजार ४४६ कोटी खर्च झाले आहेत, तर १३२९ कोटी जमा झाले आहेत. मागील वर्षी ४ हजार ०२० कोटींचा अर्थसंकल्प होता. त्यातून १ हजार १७६ कोटी खर्च झाले होते, तर १ हजार ४८७ कोटी जमा झाले होते. मागील वर्षी खर्च कमी झाला होता तर करवसुली अधिक होती. त्या तुलनेत यंदा खर्च अधिक तर जमा कमी झाली आहे. ११८८ कोटींची करवसुली बाकी मालमत्ता कर, स्थानिक संस्था कर तसेच पाणीपट्टी कर या

महापालिकेच्या जमेच्या बाजू आहेत. यातून महापालिकेला उत्पन्न मिळते. मात्र करोनामुळे करवसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. मालमत्ता कर वसूल व्हावा म्हणून अभय योजना लागू करूनही थकबाकीदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. एकूण ८८० कोटींच्या मालमत्ता कर वसुलीपैकी २८८ कोटी वसुली झाली असून अद्याप ६०३ कोटी थकबाकी आहे. तसेच स्थानिक संस्था करात १३८० कोटींपैकी ९०२ कोटी जमा झाले आहेत, तर ४७८ कोटी येणे आहे. पाणीपट्टी करात १६० कोटींपैकी ५३ कोटी वसुली, तर १०७ कोटी थकबाकी आहे. एकंदरीत एकूण ११८८ कोटींची करवसुली बाकी आहे.