मृत्युदर वाढल्याने पालिका प्रशासनाचे नियोजन; ६५ टक्के रुग्णांकडून घरातूनच फोनवर सल्ला

नवी मुंबई : राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधानंतर शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी त्या तुलनेने मृत्युदर चिंताजनक आहे. करोनाबाधित अहवाल आल्यानंतर पन्नाशी पार केलेल्या नागरिकांच्या घरातच विलगीकरण होण्याच्या अट्टहासामुळे चार ते पाच दिवसात प्राणवायू पातळी कमी झाल्यानंतर श्वसनाच्या त्रासामुळे केवळ प्राणवायू व अतिदक्षता रुग्णशय्यांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होत असून मृत्युदर वाढण्याचे हेच प्रमुख कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ५० वर्षांवरील करोनाबाधित रुग्णांनी घरी न राहता जवळच्या काळजी केंद्रात सक्तीने भरती करण्यासाठी पालिका लेखी आदेश काढणार आहे.

नवी मुंबईत सध्या १० हजार ३०० करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील ५५० रुग्णांना पालिकेच्या वतीने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून वाशी येथील काळजी केंद्रात ५० पर्यंत रुग्ण हे अतिदक्षता रुग्णशय्यांच्या प्रतीक्षेत आहेत. अशा वेळी थेट घरातून अतिदक्षता विभागातील रुग्णशय्या मागणाऱ्या रुग्णांचा विचार करणे वैद्यकीय अधिकाऱ्यांना कठीण जात आहे. पालिकेच्या काळजी केंद्रातील अडीच हजार रुग्णशय्या या अद्याप रिकाम्या आहेत. त्यात ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या रुग्णशय्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे ५० वर्षापेक्षा जास्त वय, इतर आजारांचा इतिहास, आणि कमी ऑक्सिजन पातळी (९४ ऑक्सिमीटर) आढळून आल्यास या रुग्णांना जवळच्या काळजी केंद्रात किंवा सर्मपित केंद्रात दाखल होणे हा एकमेव उपाय असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या मदत केंद्राला दररोज २०० ते २५० रुग्णांचे नातेवाईक मदतीसाठी संपर्क करीत आहेत. यात ३० टक्के दूरध्वनी हे प्राणवायू व ३५ टक्के रुग्णांसाठी अतिदक्षता विभागांची गरज असल्याच्या दूरध्वनींचा समावेश आहे. या दूरध्वनींचा पडताळणी केल्यानंतर ६५ टक्के रुग्ण हे घरातून फोन करीत असून त्यांच्या प्राणवायूची पातळी कमी होत असल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. प्राणवायूची पातळी ७० ते ८० ऑक्सिमीटरने कमी झाल्यास त्या रुग्णाला प्राणवायू अथवा अतिदक्षता विभागाची गरज पडत आहे. मात्र हाच रुग्ण बाधित झाल्यानंतर काळजी केंद्रात आल्यास त्यावर टप्प्याटप्प्याने उपचार करणे डॉक्टरांना शक्य होत आहे.

नेरुळ येथील साठी पार पडलेल्या दांपत्यांचा करोनाबाधित अहवाल आला. त्यांनी गृह अलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांनी पत्नीची प्राणवायू पातळी ७० ऑक्सिमीटरपर्यंत खाली आली. त्यांना खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. पतीही करोनाबाधित वयोवृद्ध असून त्या ज्येष्ठ नागरिकांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला.

या आजारात टप्प्याटप्प्याने उपचार झाल्यास रुग्णांना स्थिर करणे डॉक्टरांना शक्य होत आहे. मात्र प्राणवायू पातळी अतिशय कमी झाल्यानंतर डॉक्टरही हतबल होत आहेत. त्यामुळे पन्नाशी पार केलेल्या व इतर आजार असलेल्या प्रत्येक रुग्णांना आगाऊ काळात काळजी केंद्रात प्रवेश घ्यावा यासाठी लेखी सूचना केल्या जाणार आहेत.

– अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका