संतोष सावंत

पनवेलमधील तीन स्मशानभूमीतील वास्तव; अंत्यसंस्कारानंतर नातेवाईक, आप्तेष्टांना विसर्जनाचा विसर

पनवेल : अंत्यसंस्कारानंतर करोनामृतांचे अस्थिकलशही स्मशानभूमीतच पडून असल्याचे दिसत आहे. पनवेलमधील तीन स्मशानभूमीत आतापर्यंत अंत्यसंस्कार केलेल्या करोनामृतांपैकी २० टक्के मृतांचे अस्थिकलश घेण्यासाठी परत आलेले नाहीत.

पनवेल तालुक्यात करोनामुळे आतापर्यंत १२७० जणांचा मृत्यू झाल्याची पालिकेकडे नोंद आहे. मात्र अमरधाम व पोदी आणि खारघर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत १५०० जणांवर आतापर्यंत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.  यातील २० टक्के मृतांच्या अस्थी घेण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट आलेले नाहीत.अंत्यविधीनंतर उत्तरकार्यासाठी स्मशानभूमीतून मृताची अस्थी आणि देहाची राख घेण्याची प्रथा आहे. करोना मृतांचे नातेवाईक अंत्यविधीवेळी मडके देतात, मात्र त्यामध्ये अंत्यविधीनंतर ठेवलेल्या अस्थी घेण्यासाठी परत येत नाहीत. त्यामुळे २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर स्मशानभूमीतील कर्मचारीच या अस्थींचे विसर्जन करत असल्याची माहिती पनवेल पालिकेच्या आरोग्य स्वच्छता विभागाचे अधिकारी शैलेश गायकवाड यांनी दिली. काहीजण यापूर्वी  हाडांची राख चाळून घेऊन त्यामधून सोनेसदृश्य कण मिळतात का? या अपेक्षेने स्मशानभूमीत येत होते. मात्र सध्या त्यांचेही येणे बंद झाले आहे. स्मशानभूमीमधील कर्मचाऱ्यांनी अस्थिकलशावरील कपडय़ांवर संबंधिताचे नाव व स्मशानभूमीतील नोंदणी क्रमांक ओळख पटविण्यासाठी लिहून ठेवलेले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

सामाजिक संस्थेचा पुढाकार

अस्थिकलश कोणीही घेऊन जात नसल्याने पनवेलमधील एका सामाजिक संस्थेने अस्थींचे विसर्जन करून स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम विनामोबदला करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला तसा अर्ज दिला आहे.