करोना संसर्गाविषयीच्या माहितीत दिवसेंदिवस काटछाट

संतोष सावंत, लोकसत्ता

पनवेल :   करोनाशी ‘तह’ करताना माहिती हेच अस्त्र आहे. पालिका प्रशासन शक्य तितकी योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवत असेल तर त्यांच्यात रोगाबद्दल असलेली अवाजवी भीती नष्ट होईलच, याशिवाय ते  संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अधिक दक्ष राहतील. परंतु पनवेल महानगरपालिका प्रशासनाला हे मान्य नसल्याच्या आजवरच्या ‘माहितीतंत्रा’वरून स्पष्ट झाले आहे. पालिका आयुक्तांच्या आदेशावरून करोनाविषयीच्या माहितीत दिवसेंदिवस काटछाटीचे धोरण अवलंबले आहे.  त्यामुळे नागरिकांनी विस्तृत माहिती देण्याची मागणी केली आहे.

पहिली टाळेबंदी २५ मार्चपासून लागू झाली. त्यात पालिका हद्दीत जसजसा संसर्ग वाढत गेला, तशी तपशीलवार माहिती प्रशासनाने देण्यास सुरुवात केली. यात  बाधित व्यक्तीचे वय, तो राहात असलेल्या गृहसंस्थेचे नाव, पत्ता, घरक्रमांक, त्याला संसर्ग कसा झाला, बाधित व्यक्ती कोणत्या क्षेत्रात कामाला आहे आदी गोष्टींचा त्यात समावेश होता. पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली झाल्यानंतर ही माहिती आक्रसण्यास सुरुवात झाली. विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांनी माहितीतील तपशील वगळण्याचे आदेश दिले. वयाची माहिती दिली जात असल्याने बालक रुग्णांची माहिती मिळत होती. याबाबत वृत्तपत्रांमधून ठळक प्रसिद्धी मिळू लागल्यानंतर वयाचा तपशील काढण्यात आला. २० मे नंतर संसर्गाविषयीच्या माहितीत बदल होऊ लागला. ३० मे नंतर वयाची माहिती आणि संबंधित व्यक्तीला संसर्ग कोणत्या माध्यमातून झाला, याचे निष्कर्ष जाहीर करण्याचे पालिकेने  बंद केले. पालिका प्रशासनाने यापुढे जात एकाच कुटुंबातील केवळ प्रौढांच्याच वयाची माहिती देण्यास सुरुवात केली. यातून लहान मुलांच्या वयाचा मुद्दा वगळण्यात आला. त्यामुळे संसर्ग नेमका कोणत्या वयोगटातील व्यक्तींना होत आहे आणि संसर्ग नेमका कोणत्या ठिकाणी झाला, याची माहिती मिळणे बंद झाले.

माहिती आक्रसली

* १९ आणि २० जूनपासून प्रसिद्धीपत्रकातील माहितीचा परीघ आणखी कमी करण्यात आला. बाधितांवर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला ही माहिती देणे बंद करण्यात आले. २१ जूननंतर वयाची माहिती गाळून टाकण्यात आल्यामुळे  लोकप्रतिनिधींची ओरड होऊ लागल्याने त्याचा पुन्हा समावेश करण्यात आला.

* १२ जूलैपासून आयुक्त देशमुख यांनी नागरिकांसाठी नव्याने माहिती देण्यास सुरुवाात केली. या वेळी मोठय़ा माहितीला मोठी कात्री लावण्यात आली. हे असे का करण्यात आले, याविषयी प्रशासनाने पालिकेतील अपुरे मनुष्यबळ आणि वाढलेली  रुग्णसंख्या हे कारण पुढे केले. नव्या प्रसिद्धीपत्रकात वसाहतीचे नाव, वसाहतीतील त्या दिवशीची रुग्णसंख्या, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यू इतकीच माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.

टाळेबंदीत विस्तृत माहिती दिल्यास ते जनतेच्या हिताचे ठरेल. तशी  विनंती पालिका आयुक्तांकडे केली आहे.

– रवींद्र भगत, पनवेल पालिका सदस्य

‘आयसीएमआर’च्या निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्राची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे, तरीही पनवेल पालिका प्रशासन काही दिवसांपासून ही माहितीच गाळत आहे. नागरिकांना  प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती मिळाल्यास  ते त्याबाबत खबरदारी घेतील आणि संसर्गाला आळा बसेल. 

– अ‍ॅड. संजय गंगनाईक