मुंबई, ठाण्यापेक्षा कालावधी अधिक; उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट

नवी मुंबई : नवी मुंबईत करोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र आहे. ऑगस्टमध्ये ४५ दिवसांवर असलेला रुग्णदुपटीचा काळ १११ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई, ठाणे, पनवेल शहरांपेक्षा हा कालावधी जास्त आहे. तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांतही घट होत आठ दिवसांपासून संख्या सातत्याने कमी होत आहे. ही नवी मुंबईकरांना दिलासा देणारी बाब आहे.

मार्च महिन्यात शहरात करोनाचा पहिला रुग्ण सापडला तर मे महिन्यात करोना रुग्णदुपटीचा वेग हा ११ दिवसांवरून फक्त सहा दिवसांवर खाली आला होता. परंतु आता शहरात रुग्णदुपटीचा वेग १११ दिवसांवर गेला आहे. नवी मुंबई शहरात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत होता. गणेशोत्सवापासून शहरातील करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढली. परंतु आता ही संख्या नियंत्रणात आहे. पालिकेने आरोग्य सुविधांत दुपटीने वाढ केली आहे. करोना उपचारांसाठी मागील तीन महिन्यांत खाटांची संख्या दुप्पट झाली असून चाचण्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढवलेली आहे. आतापर्यंत सव्वादोन लाख्यांच्या वर करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईत करोनाबाधितंची संख्या ४० हजारांपार झाली आहे. तर शहरातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८२८ च्या पुढे गेली आहे. महापालिकेने राज्य शासनाच्या माध्यमातून ‘माझे कु टुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची पहिली फेरी पूर्ण केली आहे. परिणामी करोना रुग्णदुपटीचा काळ प्रथमच शंभरीपार झाला आहे.

करोना रुग्णदुपटीचा कालावधी

’ मुंबई महापालिका : ७१ दिवस

’ ठाणे महापालिका : ८८ दिवस

’ पनवेल : १०१

’ नवी मुंबई : १११ दिवस

नवी मुंबई शहरात रुग्णदुपटीचा कालावधी हा आजूबाजूच्या शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे, ही शहरासाठी दिलासादायक गोष्ट आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १११ दिवसांवर गेला असून मागील आठवडाभरात उपचाराधीन रुग्णही दररोज कमी होत आहेत. करोनावर मात करण्यासाठी शहरातील नागरिकांनीही खबरदारी घेऊन पालिकेला सहकार्य करावे.

 -अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

आठवडानिहाय उपचाराधीन रुग्णांची संख्या

३६५४  ७ ऑक्टोबर

३६४३  ८ ऑक्टोबर

३५६२ ९ ऑक्टोबर

३४७५ १० ऑक्टोबर

३३८९ ११ ऑक्टोबर

३४१०   १२ ऑक्टोबर

३२१५  १३ ऑक्टोबर