नवी मुंबईत आजपासून लसीकरण ठप्प; संपूर्ण ठाणे जिल्ह्याातही पाच दिवस पुरेल इतकाच साठा

नवी मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे धास्तावलेले नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत असताना लसटंचाईमुळे करोना प्रतिबंधक मोहिमेत अडथळे निर्माण झाले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गुरुवारपर्यंत केवळ लशीचा साठा जेमतेम तीन हजार इतकाच होता. हा साठाही दिवसभरात वापरात आल्यामुळे आज, शुक्रवारी  शहरातील लसीकरण लशीअभावी बंद पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, संपूर्ण ठाणे जिल्ह्याात १ लाख २३ हजार ८४० इतकाच लशीचा साठा शिल्लक असून तो विविध महापालिका आणि ग्रामीण भागात दोन ते पाच दिवसांत संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दिवसाला सरासरी आठ हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत शहरातील एक लाख ४१ हजार ७९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून आतापर्यंतच्या पात्र लाभार्थ्यांपैकी जवळपास तीन लाख नागरिकांचे लसीकरण अद्याप बाकी आहे. मात्र, लशीच्या तुटवड्यामुळे या प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता आहे. पनवेल पालिका क्षेत्रात बुधवारपासूनच लशींचा साठा शिल्लक नसल्याने लसीकरण मोहीम दोन दिवसापासून ठप्पच आहे.

पालिकेकडे ‘कोव्हिशिल्ड’च्या केवळ तीन हजार कुप्याच गुरुवारपर्यंत शिल्लक होत्या. त्यांचाही वापर दिवसभरात करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत लशीचा साठा उपलब्ध न झाल्यास लसीकरण मोहीम शुक्रवारी पूर्णपणे थांबण्याची भीती नवी मुंबई महापालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी व्यक्त केली. पालिकेचे जम्बो लसीकरण सेंटरही लशींच्या साठ्याअभावी गुरुवारीही बंद होते.

नवी मुंबई महापालिकेकडे कोव्हॅक्सिनच्या १५ हजार लस कुप्या शिल्लक आहेत, परंतु ज्या नागरिकांना पहिली मात्रा कोव्हॅक्सिनची दिली आहे, त्यांना याच कोव्हॅक्सिनची मात्रा देणे आवश्यक आहे. त्यामुळे या कोव्हॅक्सिनचा पहिल्या डोससाठी उपयोग करता येत नाही. ज्यांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला आहे, त्यांना १३ एप्रिलपासून दुसरा डोस द्यवा लागणार आहे. त्यामुळे या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन राखून ठेवण्यात आले आहे.

मुंबई

मुंबईत गुरुवारपासून लसटंचाई निर्माण झाली आहे. मुंबईतील ११८ केंद्रांपैकी जवळपास २७ केंद्रे गुरुवारी लशीच्या कुप्या उपलब्ध न झाल्याने बंद

ठेवावी लागली. तर अन्य केंद्रांवरही जेमतेम दिवस-दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. बीकेसीतील पालिकेच्या जम्बो लसीकरण केंद्रात तर केवळ चारशे नागरिकांचे लसीकरण होईल, इतकाच साठा राहिला आहे.

ठाणे जिल्ह्यात चणचण

जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागल्यानंतर स्थानिक प्रशासनाने करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला असला तरी सद्य:स्थितीत जिल्ह्यात १ लाख २३ हजार ८४० इतकाच लशीचा साठा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. ठाणे शहरात दोन दिवस, कल्याण-डोंबिवलीत दोन ते तीन दिवस, भिवंडी आणि बदलापूरमध्ये पाच दिवस, अंबरनाथमध्ये एक दिवस आणि ग्रामीण भागात पाच दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असून यामुळे नवा साठा उपलब्ध झाला नाहीतर जिल्ह्यात लसीकरण मोहीम थांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वसई-पालघर

पालघर जिल्ह्यातील लशींचा साठा शुक्रवारी संपण्याची चिन्हे आहेत तर, वसई-विरार महापालिकेकडेही जेमतेम तीन दिवस पुरतील इतक्याच लशीच्या कुप्या शिल्लक आहेत. परिणामी गुरुवारी जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी आणि लशीचा तुटवडा हे चित्र दिसून आले. वादविवाद, गोंधळ निर्माण झाला होता.