बाजार समितीचे कामकाज बंद करण्याची आग्रही मागणी

नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या दहा दिवसांत करोनाचे तीनशे रुग्ण वाढले असून यात एपीएमसी बाजार आवारातील संसर्गाचे ७९ रुग्ण झाल्याने मोठी चिंता व्यक्त होत आहे. येथून नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील रुग्ण वाढीबरोबर आता इतर जिल्ह्य़ातही संसर्ग पोहचत असल्याचे समोर आले आहे. वेंगुर्ले येथील हापूस वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाला करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे एपीएमसी बंदची आता आग्रही मागणी होत आहे. ‘क्लोज एपीएमसी, सेव नवी मुंबई’ अशी मोहीम आता समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.

गेल्या दोन आठवडय़ांत एपीएमसीत करोना रुग्ण वाढू लागले. येथील रुग्णांमुळे नवी मुंबईतील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढली. गेल्या दहा दिवसांत नवी मुंबईत तीनशे करोना रुग्ण झाले आहेत.

शहरातील रुग्ण वाढत असताना आता दुसरी धक्कादायक

माहिती समोर येत आहे. एपीएमसीतील फळ बाजारात मंगळवारी वेंगुर्ले येथील आंब्याचा ट्रक घेऊन आलेल्या एका चालकाचीही कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. त्यामुळे तेथील जिल्हाधिकारी यांनी आता तेथून ही वाहतूक बंद केली आहे, अशी माहिती फळ व्यापाऱ्यांनी दिली. हा धोका लक्षात ‘क्लोज एपीएमसी, सेव नवी मुंबई’  अशी मोहीम आता समाजमाध्यमांवर चालवली जात आहे.

फळ बाजाराची सुरक्षा तीन सुरक्षारक्षकांवर!

फळ बाजारातील प्रवेशद्वारावरील सुरक्षा अधिकाऱ्याला करोना संसर्ग होता. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या काहींना विलगीकरणात ठेण्यात आले.  त्यामुळे बाजार आवारात भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी तीन पाळीमध्ये एकूण २० सुरक्षा कर्मचारी कार्यरत होते. मात्र करोनाच्या भीतीने सुरक्षारक्षक काम सोडून गेले असून दोन प्रवेशद्वारावर अवघ्या तीन सुरक्षा रक्षक आहेत. गेले तीन दिवसांपासून फळ बाजाराच्या प्रवेशद्वारावर कोणतीही सुरक्षा नाही. प्रवेशद्वारावरून सर्वाना थेट प्रवेश दिला जात आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

बाजारात सुरक्षारक्षक कमी आहेत, मात्र खासगी सुरक्षा रक्षक मागविले आहेत.  एच आणि एम विंगमध्ये सामाजिक अंतराचे उल्लंघन होत असेल, त्या ठिकाणी वारंवार सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना केल्या जात आहेत. तसेच प्रवेशद्वारावर सुरक्षेच्या उपाय योजना उपलब्ध आहेत.

-अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी.