लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबईत करोनामुक्तीचा दर ९५ टक्क्यांवर पोहोचला असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ही एक हजारापर्यंत आली आहे. शहरात १ हजार ११२ रुग्ण उपचार घेत आहेत.

नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या  ४६ हजार ३१३ पेक्षा अधिक झाली असून ९४४ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ हजार ५०० पर्यंत ही पोहोचली होती. परंतु आता दररोज वाढणारे रुग्ण कमी होत आहेत. मंगळवारी ९१ नवे करोनाबाधित आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

सिडको कर्मचाऱ्यांच्या चाचण्या

पालिका प्रशासन जास्तीत जास्त नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यावर भर देत असून आतापर्यंत तीन लाख चाचण्या केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून संशयितांच्या चाचण्यांबरोबर एपीएमसीतील माथाडी, व्यापारी व एमआयडीसीतील कामगारांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. आता पालिका सिडको कर्मचाऱ््यांच्या चाचण्या करणार आहे.

दिवाळीत मोठय़ा प्रमाणात शहरात, बाजारपेठेमध्ये तसेच मॉलमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली असल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

नवी मुंबई शहरात करोनाचे रुग्ण कमी होत असताना जास्तीत जास्त नागरिकांच्या करोना चाचण्या करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. सर्व सिडको कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे.
 -राजेश कानडे, उपायुक्त नवी मुंबई महापालिका