राज्य सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याची घोषणा करताना मॉल्स मात्र सुरु करण्याची परवानगी दिली होती. यामुळे ५ ऑगस्टपासून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत मॉल सुरु झाले. त्यामुळे पुन्हा एकदा जवळजवळ सोडचार महिन्यानंतर मॉलचे दरवाजे ग्राहकांसाठी खुले झाले. दरम्यान मॉलचे शहर असलेल्या नवी मुंबईतही बुधवारी मॉल सुरु झाले होते. मात्र मॉल सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बंद करण्याचा आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव यामुळे शहरातील मॉल व इतर व्यवहार मार्चच्या मध्यापासून ठप्प झाले. करोनाची वाढती संख्या पाहता संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी यांनी पहिली टाळेबंदी घोषित केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती पुढे वाढत गेली. त्यामुळे लाखोंचे रोजगार गेले, तर व्यापार धोक्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत टप्प्याटप्प्याने पुन्हा व्यवहार हळुहळू सुरू करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर कोपखैरणे, वाशी, नेरुळ, सिवूड भागात मॉल सुरु करण्यात आले होते. प्रमुख मॉलमध्ये पहिल्याच दिवशी मोजक्याच ग्राहकांची पावले विविध दालनांकडे वळली. यावेळी मॉल व्यवस्थापनाकडून अंतराच्या नियमाचे पालन करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने प्रतिबंधक उपाय म्हणून मॉल बंद करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. यामुळे नवी मुंबईकरांचा मॉल्स सुरु झाल्याचा आनंद एका दिवसापुरताच राहिला.