लोकसत्ता वार्ताहर
नवी मुंबई : नियमांचे पालन होत नसल्याने एकीकडे महापालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारत आहे. एपीएमसीत मात्र फेरीवाल्यांमुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एपीएमसी फळ बाजारासमोरील रस्ते व पदपथावर फेरीवाल्यांमुळे गर्दी होत आहे. फळ मार्केटसमोरील हा रस्ता सानपाडा रेल्वे स्थानक, शीव -पनवेल महामार्ग, तुर्भे स्थानकाला जोडणारा असल्याने वर्दळीचा आहे. या रस्त्यावर अवजड वाहने, मोठे टेम्पो व इतर वाहनांची रहदारी असते. तसेच एपीएमसी बाजारात खरेदीकरिता येणाऱ्या ग्राहकांचीही मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावर हे फेरीवाले पदपथ असो की रस्ता या ठिकाणी बसून व्यवयसाय करीत आहेत. याचा पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्केटपासून सानपाडा रेल्वेस्थानक अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने येथे रोज हजारो नागरिक ये-जा करत असतात. मात्र फेरीवाले रस्ता आडवून बसलेले असतात. त्यामुळे दररोज वाहतूककोंडी होत असते
बेकायदा पार्किंग
याच रस्त्यावर फेरीवाले बसत असल्याने नागरिक बेकायदा वाहने उभी करीत आहेत. फेरीवाल्यांचीही वाहने उभी असतात. यामुळे वाहतूककोंडी होत असते. शेजारीच वाहतूक पोलीस चौकी आहे. मात्र कोणतीच कारवाई होत नाही.
येथील फेरीवाल्यांवर नेहमीच कारवाई केली जाते. पंरतु ते पुन्हा बसतात. करोनामुळे मनुष्यबळ कमी पडत असल्याने सध्या कारवाई होत नाही. मात्र लवकरच पथक पाठवून कारवाई केली जाईल.
-सुबोध ठाणेकर, विभाग अधिकारी, तुर्भे
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 26, 2020 2:28 am