पनवेल पालिका हद्दीत मृत्यूदर देश-राज्यापेक्षा अधिक; रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तुलनेने जास्त

संतोष सावंत, लोकसत्ता

पनवेल : करोनाबाधितांचा देशातील मृत्यूदर २.८८ टक्के, राज्याचा ३.७३ टक्के इतका तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मृत्यूदर ४.४३ टक्के इतका असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे, उपजिल्हा रुग्णालयात मागील ८७ दिवसांत करोना उपचारासाठी दाखल झालेल्या ४५६ रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावलेला नाही. यातील ३६४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य योद्धय़ांमुळे करोनावर मात करण्यात यश आल्याचे स्पष्ट झाले आहे.

पनवेल पालिका क्षेत्रात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा दर देश व राज्यापेक्षा जास्त आहे.

सध्या पालिका क्षेत्रातील इंडियाबुल येथील विलगीकरण कक्षात १६२ संशयित रुग्ण, तर अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज असलेल्या ११६ रुग्णांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उणिवा काय?

* उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत अतिदक्षता विभाग सुरू झालेला नाही. सध्या कामोठेतील येथील धर्मादाय तत्त्वावर चालणारे खासगी एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रुग्णांना दाखल केले जात आहे. मृत्यूदर वाढीबाबत एमजीएम रुग्णालय संचालकांनी रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी येथे आणले जात असल्याचे सांगितले.

* पालिका हद्दीत मृत्यू झालेल्यांमध्ये ४५ हून अधिक वय असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.

दहा तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती मृत्यूदर रोखण्यासाठी उपाययोजना अमलात आणीत आहे. मृत्यूदर जास्त असला तरी उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाण पनवेलमध्ये सर्वाधिक आहे.

– सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका

       वय                    बरे झालेले   रुग्ण

* ० ते १४ वर्षे वय          ४४

* १५ ते ३० वर्षे             ११९

* ३१ ते ४० वर्षे             १२८

*  ४१ ते ५० वर्षे           ६९

* ५१ ते ६० वर्षे            ६५

* ६० वर्षांवरील           २६

एकूण                      ४५१

ठणठणीत बरे

*  पालिका क्षेत्रात आजवर १०१६ पैकी ७०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

* पालिका हद्दीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.७८ टक्के आहे. हा दर राज्य आणि देशाच्या दरापेक्षा अधिक आहे. देशाचा करोनाग्रस्त बरे होण्याचा दर ५२.३७ टक्के तर राज्याचे प्रमाण ५०.६१ टक्के आहे.