लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : मुंबई महानगर पालिकेप्रमाणे नवी मुंबई शहरात देखील नागरिकांना मुखपट्टी लावणे सक्तीचे केले आहे,  नवी मुंबई शहरात ही कोरोना ग्रस्ताचा आकडा वाढत आहे. नवी मुंबई महापालिका विविध नियोजन करून समाजिक अंतर कायम ठेवण्यासाठी तसेच गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरात ही एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच रस्ते, रुग्णालयात, बाजारपेठ इत्यादी अत्यावश्यक ठिकाणी जाण्यासाठी मास्कचा वापर करावा असे सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न वापरल्यास तसेच इतरत्र ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.  आजवर एकूण १६५ जणांवर कारवाई करून एक लाख ९५ हजार ५०० रुपये  दंड वसूल करण्यात आलेला आहे. यामध्ये मुखपट्टी न वापरणाऱ्या ५८ जणांवर तर ६५ दुकान धारकांवर सामाजिक अंतर न पाळल्याने  कारवाई करण्यात केली आहे, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर ५० हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मुखपट्टी  न वापरणाऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रु तर दुकान धारकांकडून  दोन हजार रुपये दंड आकारला.