07 July 2020

News Flash

करोनाचा कहर : हंडाभर पाण्यासाठी दीड किलोमीटरची पायपीट

येरमाळ वाडीवरील आदिवासी महिलांच्या नशिबी यंदाही टंचाई

संग्रहित छायाचित्र

येरमाळ वाडीवरील आदिवासी महिलांच्या नशिबी यंदाही टंचाई

पनवेल : तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीमधील येरमाळ या वाडीवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील आदिवासी महिलांना डोक्यावर पाण्याचे हंडे आणि घागर घेऊन दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी शिरवली ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ आहेत. पारधी यांच्याकडे अध्यक्ष पदाची धुरा आल्यावर आदिवासी महिलांचे प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा पनवेलमधील पाडय़ांना होती. मात्र, करोनाकाळात प्रशासकीय यंत्रणा संबंध गुंतल्याने यंदाच्या उन्हाळ्यातही महिलांची हंडा घेऊन पायपीट कायम राहिली आहे.

येरमाळ ही आदिवासी वाडी सुमारे ६०० कुटुंबांची आहे. तालुक्यातील लहान मोरबे धरणाला खेटून असलेल्या या वाडीतील कुटुंबे  तहानलेली आहेत. याच परिसरात भल्याची वाडी, करंबेळी अशा १२ वाडय़ा आहेत. मोरबे धरण दुंदरे, खैरवाडी आणि मोरबे अशा तीन ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा होतो.  मात्र, येथील पाडय़ांना पाण्याविना दिवस कंठावा लागत आहे.

जिल्हापरिषद अध्यक्षा पारधी हे जिल्ह्यच्या नवीन योजना येथे राबवतील, अशी आदिवासी बांधवांची अपेक्षा होती. मात्र, करोना काळात तेही अशक्य झाले. वाडीपासून दूर असलेल्या एका शेतघर मालकाच्या मोटारपंपावरून आदिवासींना पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.

पनवेलचे ग्रामीण प्रशासन तालुक्यात पाच गावे आणि सात आदिवासी पाडय़ांना दोन टँकरने पाणीपुरवठा पिण्यासाठी करीत आहे. परंतु, इतर वापरासाठी पाण्याचा तुटवडा भासत आहे.

गटविकास अधिकाऱ्यांनी  आखलेल्या पाणी नियोजनानुसार सध्या वाडीच्या पाणी नसलेल्या विहीरीत टँकरने पाणी सोडले जात आहे. परंतु,हे पाणी अपुरे पडत आहे. पनवेल पालिका क्षेत्रातील टेंभोडे येथेसुद्धा पाणीप्रश्न तीव्र झाला आहे.

ग्रामपंचायत कार्यालयासाठीही पायपीट

सरकारची कोणतीही योजना मिळविण्यासाठी येरमाळ, भल्याचीवाडी व इतर १० वाडय़ांना शिरवली ग्रामपंचायतीचे कार्यालय गाठावे लागते. वाडय़ांपासून सुमारे १५ किलोमीटर अंतर दूर हे कार्यालय आहे. या वाडय़ांसाठी खैरवाडी ही ग्रामपंचायतनजीक आहे. येथील १२ आदिवासी वाडय़ांसाठी सरकारने दवाखाना सुरू केलेला नाही.  गर्भवती महिलांना प्रसुतीवेळी वावंजा, नेरे या आरोग्य केंद्र वा कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात जावे लागते. शिरवली ग्रामपंचायतीच्या परिसरात सात वाडय़ा व सात गावे येतात. हा संपूर्ण परिसर १५ किलोमीटर आहे.

‘चव लागत नाही’

मोरबे धरण दुरुस्तीमुळे कोरडे केल्याने जलवाहिनीने पाणी देणे शक्य होणार नाही. येरमाळच्या सरपंचांशी संपर्क साधला असता त्यांनी काही कुटुंबांना टँकरच्या पाण्याची चव लागत नाही त्यामुळे तेथील महिला झरम्याचे पाणी आणण्यासाठी जात असल्याची माहिती पनवेल गटविकास अधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.

जल नियोजन आराखडय़ात पनवेलमधील टंचाईग्रस्त भागांत पुरेसे पाणी कसे नेता येईल, यासाठी नियोजन केले आहे. पाण्यासोबत महिला आणि बालकांना प्राथमिक उपचार आणि प्रसूती सेवा किमान घराजवळ आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

-योगिता पारधी, अध्यक्षा रायगड जिल्हा परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 7:14 am

Web Title: coronavirus pandemic one and half kilometer walk for one bucket of water coronacha kahar dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 नवी मुंबईत मुखपट्टी न वापरणाऱ्यांना दंड
2 नवी मुंबई : दिवसभरात आढळले ८० नवे रुग्ण, दोन जणांचा मृत्यू
3 नवी मुंबईत पोलीस आणि त्यांचे नातेवाईक ६६ जणांना करोनाची लागण
Just Now!
X