लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : करोना नियमांचे पालन होत नसल्याने पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली असून आतापर्यंत १६ हजारांहून अधिक नागरिकांकडून ७८ लाखांचा दंड वसूल केला आहे. शहरात करोनाबाधितांची संख्या पन्नास हजारांच्या घरात पोहोचत असतानाही नागरिकांची बेफिकिरी सुरू असल्याचे यावरून दिसून येते.
आतापर्यंत नवी मुंबईत ४८ हजार ३६६ इतकी करोनाबाधितांची संख्या झाली आहे, तर ९८६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या करोनावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने करोना नियमांचे पालन करणे एवढेच आपल्या हाती आहे. शहरात संसर्ग वाढू नये यासाठी मुखपट्टीचा वापर, समाजिक अंतर व वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे.
मात्र शहरात अनेक ठिकाणी या नियमांचे पालन होत नाही. पालिका प्रशासनाने जनजागृती करूनही नागरिक नियम पाळत नसल्याने दंडात्मक कारवाई सुरू केली होती.
यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून १ हजार, मुखपट्टी न वापरणे ५००रुपये, सुरक्षित अंतर न पाळल्यास २०० रुपये व व्यापारी, दुकानदार यांच्याकडून २ हजार रुपये आकारले जात आहेत. या कारवाईअंतर्गत आतापर्यंत पालिका प्रशासनाने १६ हजार नागरिकांवर कारवाई करीत ७८ लाखांचा दंड वसूल केला आहे.
करोनाला हरवण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांनी करोना नियमावलींचे पालन केले पाहिजे. दंड वसूल करावा लागू नये असे नागरिकांनी वागावे. परंतु शिस्तीचे पालन हात नाही. त्यामुळे ही कारवाई करावी लागली. नागरिकांनी नियमावलींचे पालन करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 4, 2020 3:28 am