दोन दिवस पालिका मुख्यालय बंद

पनवेल : शहर महापालिका क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून कमी होणारी बाधितांची संख्या पुन्हा गुरुवारी नव्याने वाढ झाल्याची पाहायला मिळाली. गुरुवारी पालिका क्षेत्रात १६५ बाधित आढळले. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पालिका हद्दीत आजवर ९० जण दगावले आहेत. गुरुवारी करोनामुक्त झालेल्यांची संख्या ९२ झाली आहे.

आजवर ८८२६ जणांची  चाचणी केल्यानंतर पालिका क्षेत्रात ३३३० बाधित आढळले आहेत. यापैकी  २००६ जण करोनामुक्त झाले आहेत. तर १२३४ रुग्ण उपचार घेत आहेत. पालिका मुख्यालयातील १५ अधिकारी आणि कर्मचारी बाधित आढळल्यानंतर  शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस मुख्यालयाची इमारत र्निजतुकीकरण बंद राहणार आहे. पालिका अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या घरून काम करणार असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगीतले. मागील चार महिन्यांपासून पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणतीही सुट्टी घेतली नसल्याचे आयुक्त देशमुख यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

३०० रुग्ण संख्येची तफावत

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या संकेतस्थळावर प्रत्येक नोंदणीकृत प्रयोगशाळेला संशयित रुग्णाची चाचणी अहवाल सकारात्मक आल्याची नोंद तपशीलवार भरावी लागते. त्यामुळे राज्य सरकारच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम दैनंदिन जाहीर होत असलेल्या यादीत त्या पद्धतीने रुग्णांची संख्या दर्शविली जाते. यामुळे संबंधित पालिका प्रशासनाला त्यांच्या परिसरात नेमके किती रुग्ण याचा शोध घेता येतो. पालिका व एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात ३०० रुग्णांचा फरक आढळला.

 कारवाई सुरूच

दुकाने चालू ठेवणाऱ्यांवर पनवेल पालिका प्रशासनाने एक लाख ३३ हजार रुपये वसुलीची दंडात्मक कारवाई केली आहे. मुखपट्टी न लावता फिरणे, सामाजिक अंतराचा नियम न पाळणे, टाळेबंदीचा भंग करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करण्यासंबंधी पालिका आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे. यात सर्वाधिक कारवाई प्रभाग ड समितीत ६६ हजार ९०० रुपये, प्रभाग अ समितीत ३२ हजार ४००, प्रभाग क समितीमध्ये २६ हजार ८०० तर ब प्रभागामध्ये सात हजार ५०० रुपयांचा दंड अधिकाऱ्यांनी वसूल केल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.