बाधितांची संख्या १९ वरून ६० वर

लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आलेली करोनाबाधितांची संख्या दिवाळी सणानंतर वाढू लागल्याने पनवेलकरांची चिंता वाढली आहे. तीन दिवसांपूर्वी प्रति दिवस १९ नवे रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी ३१आणि बुधवारी ६० नवे करानाबाधित आढळले आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये पुन्हा करोना संकटाला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होऊ  लागली आहे.

रुग्णवाढ होऊ लागल्याने पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा खाटांची संख्या वाढवण्याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. दोन धर्मादाय रुग्णालयांसोबत करार रद्द केल्यामुळे पालिकेच्या हक्काच्या उपजिल्हा रुग्णालयात अवघे ८ अतिदक्षता खाटा उपलब्ध असून  त्यापैकी सर्वच खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णवाढ वाढत गेल्यास अत्वस्थ रुग्णांचा प्रश्न निर्माण होणार आहे.

पनवेलमध्ये करोनामुळे ५७० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून १४५३८ जण बाधित झाले आहेत. सध्या ४१० रुग्ण करोना संसर्गावर उपचार घेत आहेत. पनवेल पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेकडे टीआर सभागृहात अडीचशे खाटांचे नियोजन आहे तर वेळ पडल्यास इंडिया बुल येथे दोन हजार खाटा उपलब्ध होतील.  याव्यतिरिक्त उपजिल्हा रुग्णालयात १३० प्राणवायू खाटांचे नियोजन आहे. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पनवेलसाठी तीन महिन्यांपूर्वी ५३ कृत्रिम श्वसन यंत्रणा खाटांची उपलब्धता केली होती. त्यापैकी दहा खाटा पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात तर ३३ खाटा कामोठे येथील एमजीएम व नेरुळ येथील डी वाय पाटील रुग्णालयांना दिल्या आहेत. करोनाचा संसर्ग वाढल्यास जिल्हाधिकारी या दोन्ही रुग्णालयांकडून तातडीची मदत घेऊ  शकतील असे नियोजन आहे.

नियमांना हरताळ

दिवाळीच्या काळात जमाव जमविणे, मुखपट्टी न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीला हरताळ फासल्याने हे संकट ओढवले आहे. तसेच नागरिकांनी दिवाळीत पालिकेच्या निर्देशांचे पालन न केल्याने  करोनाग्रस्तांची संख्या मागील तीन दिवसांत वाढल्याचे प्रशासनाचे मत आहे.

दोनशे खाटांची मागणी, मिळणार १५ खाटा

सिडकोकडे पनवेल पालिकेने दोनशे खाटांच्या कोविड रुग्णालयाची मागणी केली होती. सिडकोने करोनाची संख्या उतरत्या काळात रुग्णालय देण्याची मागणी मान्य केली. मात्र दोनशे खाटांपैकी पनवेल पालिकेला अवघे पन्नास खाटाच उपलब्ध होणार आहेत. जागेच्या निवडीवरून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दीड महिना घालवला. त्यानंतर शंभर खाटांएवजी १५ अतिदक्षता खाटांचे कळंबोली येथील समाजमंदिरात उभारण्याचे नियोजन आखले आहे. अजूनही प्रत्यक्षात रुग्णालयाच्या उभारणीला सुरुवात झाली नाही.

नवी मुंबईतही रुग्णवाढ

नवी मुंबई : गेले आठ दिवस शंभरच्या खाली असलेली करोनाबाधितांची संख्या बुधवारी १३१ पर्यंत गेली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुढील काळात रुग्णसंख्यावाढीची चिंता व्यक्त होत आहे.

नवी मुंबईत एकूण ४६,४४४ करोनाबधित झाले आहेत. तर करोनामुक्तीचा दर ९५ टक्के आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत होता. मात्र दिवाळीत झालेली गर्दी पाहता पुढील काळात रुग्णवाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी १३१ नवे बाधित आढळले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ९४७ जणांचा मृत्यू झाला आहे.  बुधवारी शहरात १०२ जण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत  एकूण ४४,३५९ जन करोनामुक्त झाले आहेत. सध्या १,१३८ रुग्ण उपचाराधीन आहेत.